नवी दिल्ली - एटीएममधून आता लवकरच हिंदी भाषेत विवरण असणारी स्लीप मिळणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार गृह मंत्रालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने यापुढे बँकांना अशा प्रकारच्या एटीएमची खरेदी करण्याचे निर्देश द्यावे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना इंग्रजी बरोबरच हिंदी भाषेत स्लीप मिळणे सहज शक्य होणार आहे.
याबरोबरच सध्या वापरात असणा-या एटीएममध्ये ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी त्यांचे सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याच्या संदर्भातही सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या या पत्राला डिपार्टमेंट ऑफ फायनांशिअल सर्व्हीसेसने 29 जूनला उत्तरही दिले असून, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यात म्हटले आहे.
सध्या ज्या राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते, त्या राज्यांमधील बँकांच्या एटीएममधून हिंदी भाषेत स्लीप उपलब्ध होईल. सध्या केवळ इंग्रजी भाषेतच स्लीप उपलब्ध होते. मंत्रालयाने यासंबंधी 25 फेब्रुवारीला आरबीआयच्या गव्हर्नरला एक पत्र लिहिले होते. नुकतीच गृहमंत्रालयाने सर्व विभागांना हिंदीमध्ये काम करण्याच्या सूचना दिल्याची बातमी आल्यानंतर त्या मुद्यावरून अनेक वाद झाले होते. दक्षिणेकडील राज्यांनी याला प्रामुख्याने विरोध दर्शवला होता.
दरम्यान देशातील लोकसभेच्या बहुतांश जागा असणा-या हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्राबल्य निर्माण करण्याच्या उद्देशाने भाजपने हिंदी भाषेच्या बाबतीच गांभीर्याने निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रामुख्याने हिंदी हिच मुख्य भाषा आहे. तसेच हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मिर या राज्यांसाठीही हा निर्णय परिणामकारक ठरू शकतो, त्यामुळेच हिंदी भाषेच्या वापरावर भर देण्यात येत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
फोटो - प्रतिकात्मक