नवी दिल्ली - समलैंगिकता ही व्यक्तिगत बाब आहे. त्याकडे गुन्हा म्हणून बघितले जायला नको, असे मत रा.स्व. संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले. अर्थात यामुळे इतरांच्या जगण्याला काही बाधा निर्माण होऊ नये, अशी अपेक्षाही होसबळे यांनी बोलून दाखवली.
एका कार्यक्रमात बोलताना होसबळे म्हणाले की, समलैंगिकतेसारख्या मुद्द्यावर खरे तर संघाने चर्चा करण्यासारखे काही नाही. परंतु ही व्यक्तिगत बाब आहे. परंतु त्याकडे गुन्हा म्हणून बघितले जाऊ नये आणि त्यासाठी शिक्षाही केली जाऊ नये. "भारतमाता की जय'वरून सुरू असलेल्या वादावर ते म्हणाले की, आम्ही कोणाला तशी सक्ती केलेली नाही, परंतु कोणी जर आम्ही म्हणणारच नाही असे म्हणत असेल तर ते देशविरोधी आहे. या घोषणा संघाने दिलेल्या नाहीत. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात स्वातंत्र्यसेनानींनी त्या दिलेल्या आहेत.
भादंविच्या कलम ३७७ नुसार समलैंगिकता हा गुन्हा ठरतो आणि त्यासाठी जास्तीत जास्त १० वर्षे शिक्षेची तरतूद आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही अलीकडेच हा गुन्हा ठरवू नये असे म्हटले होते. भारतासह जगातील ७० देशांमध्ये हा गुन्हा मानला जातो.