आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयू वाद : \'जामिनावर सुटलेला \'हीरो\' कसा\', अनुपम खेर यांचा प्रश्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात "बुद्ध इन अ ट्रॅफिक जाम' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आलेले अभिनेते अनुपम खेर यांनी देशविरोधी घोषणांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली. तुम्ही राजकारण करत आहात अन‌् ते प्रत्येकजणच करत असतो. आमच्या विद्यार्थिदशेत आम्हीही आंदोलने केली आहेत. मात्र, देशाविरोधात नाही. जामिनावर सुटलेला व्यक्ती तुरुंगाबाहेर येतो अन‌् त्याचे स्वागत केले जाते. देशाविरोधात बोलणारा हीरो कसा काय बनू शकतो, असा सवाल खेर यांनी या वेळी उपस्थित केला.

तुम्हाला देशात उपासमारीपासून मुक्ती हवी आहे. मग तुम्ही ती हटवण्यासाठी काय प्रयत्न केलेत. देश निर्माणासाठी तुम्ही काय केले. या देशाची सतत टीका करण्याची गरज नाही. आपले आई-वडील गरीब असल्याचे तू नेहमी सांगतो. अरे बेटा, तू इतक्या वर्षांनी येथे आला अन‌् राहिला. मात्र, ते तर तसेच आहेत ना. त्यांची गरिबी दूर करण्यासाठी तू काय केलेस? अशा प्रश्नांची सरबत्तीही खेर यांनी कन्हैयावर केली. दरम्यान, त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचाही खेर यांनी या वेळी समाचार घेतला. अभाविपने त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. तर, डाव्यांनी आक्षेप घेतला. दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाचीही झाली. कन्हैया कुमारने खेर यांच्या वक्तव्याला उत्तर देताना म्हटले, अनुपमजी जेएनयूमध्ये आले. मात्र, त्यांनी कृपा करून आम्हाला ज्ञान पाजळू नये.
गिलानीच्या जामिनावर सुनावणी : प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात देशद्रोही घोषणाबाजीच्या कारणावरून अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक एसएआर गिलानी यांच्या जामीन याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही. त्यांच्या जामीन याचिकेची प्रत आपल्याला अद्याप मिळाली नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक वर्ग यांनी सांगितल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी शनिवारी होईल. दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेनेही गिलानी यांच्या सुटकेची मागणी केली आहे.

जेएनयूत आज विजयी मोर्चा
देशद्रोहाच्या अारोपाखाली अटकेत असलेला जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना ६ महिन्यांचा अंतरिम जामीन मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विजयी मोर्चा निघण्याची शक्यता आहे. त्यांना जामीन मिळाल्याचे वृत्त धडकताच शुक्रवारी जेएनयूमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर दोघांची शनिवारी तिहार तुरुंगातून सुटका होईल. त्यांच्या जेएनयूतील आगमनाच्या पार्श्वभूमीवर विजयी मोर्चा काढण्याची विद्यार्थ्यांची तयारी आहे. कन्हैया कुमारची ३ मार्च रोजी तुरुंगातून सुटका झाली होती तेव्हाही जेएनयूमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.
देशद्रोह कायदा रद्द करण्यासाठी संघर्ष करणार : कन्हैया
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार आता देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यासाठी संघर्ष करणार आहे. तो म्हणाला, लोकशाहीच्या समर्थकांनी आमच्यासोबत यायला हवे. ही एक दीर्घ लढाई असून आम्ही ती जारी ठेवू. मी तुरुंगात राहिलेलो असल्याने त्याठिकाणची परिस्थिती मला माहीत आहे. या प्रकरणी आमचे कॉम्रेड पुन्हा सोबत येत असल्याचा आम्हाला आनंद आहे.
बातम्या आणखी आहेत...