नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एवढ्या मोठ्या पराभवाचा सामना का करावा लागला? आणि भाजपने एवढ्या जागा कशा जिंकल्या याची कारणमीमांसा करणे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जमेनासे झाले आहे. त्यामुळे या प्रश्नाने चैन हरपलेल्या राहुल गांधींनी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना या पराभवाचे कारण विचारले आहे. बुधवारी राहुल गांधी यांनी संसदेमध्ये टीएमसीचे खासदार सौगाता राय आणि काकोली घोष यांच्याशी सुमारे 45 मिनिटे भाजपच्या वाढलेल्या प्रभावाबाबत आणि इतर मुद्यांवर चर्चा केली. मोदींनी ममता बॅनर्जींची स्तुती केल्यानेही टीएमसीने आनंद व्यक्त केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या बातमीनुसार राहुल संसदेत मागे बसलेल्या या खासदारांच्या जवळ गेले व त्यांच्याबरोबर अनौपचारिक चर्चा सुरू केली. भाजपने मिळवलेला मोठा विजय हाच या चर्चेचा मुख्य विषय होता अशी चर्चा आहे. यूपीए-2 च्या कार्यकाळात काँग्रेसने मध्येच तृणमूल काँग्रेसबरोबर काडीमोड घेतला होता. उत्तर प्रदेशमध्ये यावेळी एकही मुस्लीम खासदार विजयी झाला नाही. त्यामुळे याठिकाणी खरंच यावेळी धार्मिक मुद्दा इथर मुद्यांच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरला का? हे जाणून घेण्याचा प्रयत्नही राहुल गांधी यांनी केला.
या वृतानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपचे भवितव्य काय आहे? हेही राहुल गांधी यांनी या खासदारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचे कारण म्हणजे या निवडणुकांमध्ये भाजपने बंगालमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आहे. पक्षाला निवडणुकीत सुमारे 17 टक्के मते मिळाली आहेत. मात्र विजय केवळ दोनच जागांवर मिळवता आला आहे.
पुढे वाचा : मोदींच्या स्तुतीने टीएमसी आनंदात