आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Liable Modi For PM Post When He Spyed Woman ? Congress Question

महिलांची हेरगिरी करणारे मोदी पीएमपदासाठी लायक कसे ? - काँग्रेसचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुजरातेत 2009 मध्ये शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून एका तरुण महिला वास्तुविशारदावर पाळत ठेवल्याचा कोब्रापोस्टचा दावा खरा असेल तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे ‘भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार’ होण्यास लायक असूच शकत नाहीत, असा हल्ला चढवत रविवारी काँग्रेसच्या महिला नेत्यांनी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास आणि जयंती नटराजन, उत्तर प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा रिता बहुगुणा-जोशी आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा ओझा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर जोरदार हल्ला चढवला. गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने एका कुलीन महिला वास्तुविशारदावर पावलोपावली हेरगिरी केली, तिच्यावर पाळत ठेवली, तिचा पाठलाग केला. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यामुळे केवळ त्या महिलेचाच नव्हे, तर भारतातील प्रत्येक महिलेच्या आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेलाच हात घालण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप या महिला नेत्यांनी केला. या महिलेच्या खासगी आयुष्यात केलेल्या ढवळाढवळीस मोदी आणि गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. या महिलेची कशासाठी चौकशी करण्यात आली? कोणाच्या सांगण्यावरून गुप्तचर विभाग, गुन्हे शाखा आणि एटीएसने त्या महिलेची हेरगिरी केली? या प्रश्नांची उत्तरे गुजरात सरकारने द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
काँग्रेसकडून बदनामी -भाजप : पोलिसांकडून त्रास होत असलेल्या तरुणीच्या वडिलांच्या सांगण्यावरून तिच्या संरक्षणासाठी असे करण्यात आले. काँग्रेस या प्रकरणाचा राजकीय फायदा घेऊन मोदींना बदनाम करण्यासाठी वापर करत आहे, असे भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी म्हणाल्या.
जदयूने मागितला राजीनामा
महिलेची हेरगिरी केल्यामुळे मोदींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जदयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी केली. त्यांनी या प्रकरणाची सर्वोच्च् न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
ते ‘साहेब’ म्हणजे नरेंद्र मोदीच
या पाळतीदरम्यानच्या संभाषणात गुजरातचे माजी गृहमंत्री शहा यांनी ज्यांचा ‘साहेब’ म्हणून उल्लेख केला आहे ते साहेब दस्तुरखुद्द नरेंद्र मोदीच असल्याचे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनीच स्पष्ट केले आहे, असा दावा रिता बहुगुणा यांनी केला.
काय आहे प्रकरण?
मोदी यांचे अत्यंत विश्वासू अमित शहा यांनी एका ‘साहेबां’च्या सांगण्यावरून 2009 च्या सप्टेंबरमध्ये एका महिलेवर बेकायदेशीररीत्या पाळत ठेवल्याचा दावा ‘कोब्रापोस्ट’ व ‘गुलेल’ या दोन पोर्टल्सनी 15 नोव्हेंबर रोजी केला. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ शहा आणि आयपीएस अधिकारी जी.पी. सिंघल यांच्यातील संवादाची ध्वनिफीतही त्यांनी जाहीर केली.
सत्तेत राहण्याचा मोदींना अधिकार नाही
एका महिलेच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आला असेल तर मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी राहण्याचा नैतिक आणि राजकीय अधिकार पोहोचत नाही. एवढेच नव्हे तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यासही ते लायक नाहीत. - रिता बहुगुणा, यूपी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा