आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Become IAS To Teach Lesson Like Asaram Physical Assualted Girl Say

आसारामसारख्यांविरुद्ध लढण्यासाठी आयएएस होणार - पीडित मुलगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीडितेच्या घरातून (उत्तर प्रदेश) - ‘माझं आयुष्य पहिल्यासारखं राहिलेलं नाही. ती रात्र माझ्यासाठी काळरात्र ठरली. मी कधीही विसरू शकणार नाही. आसारामांनी आमची स्वप्ने उद्ध्वस्त केली. आधी सीए व्हायची माझी इच्छा होती. मात्र अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी आता आयएएस अधिकारी होण्याची इच्छा आहे. त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर. फक्त हा कठीण समय निघून जावा..’

उत्तर प्रदेशातील हे एक छोटेखानी शहर आहे. मेन रोडवर ट्रान्सपोर्ट कंपनी व त्यावरील दुमजली घरावर पोलिसांचा पहारा आहे. घरात पीडिता राहते, मात्र कुणालाही भेटण्याची तिची इच्छा नाही. तीन दिवस असेच जातात. शेवटी ती वडिलांच्या माध्यमातून संवाद साधण्यास राजी होते. त्यांची काळजी वेगळीच. ‘काही बोललो तर गैरअर्थ काढून न्याय हिरावला जाऊ नये या भीतीने आम्ही बोलत नव्हतो’, असे ते म्हणाले.

पीडिता राहते त्या खोलीत बापूंचे पुत्र नारायणसाई यांनी दीड वर्षापूर्वी मुक्काम केला होता. त्या काळी बापू पीडितेच्या शहरात नवा आश्रम उभारत होते. पीडितेकडे हायस्कूल परीक्षेचे प्रमाणपत्र आहे. त्यावरील जन्मतारखेच्या नोंदीवरून ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट होते. मात्र, ती सज्ञान असल्याचा दावा बापूंचे वकील करत आहेत. पीडिता सर्वच विषयांत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाली होती.

तिच्या घरात कमालीची शांतता आहे. ती वडिलांना म्हणते, ‘मी आता शहरात शिकू शकत नाही. बाहेरही पडू शकत नाही. जोधपूरमधील त्या काळरात्रीने माझे सर्वस्व हिरावून घेतले आहे. मी कधीच पूर्वीसारखी राहणार नाही. आसारामने माझ्या भूतकाळाला बट्टा लावलाच, पण भविष्यही उद्ध्वस्त केलंय. माझ्यासोबतच लहान भावाचंही वर्ष वाया गेलंय. आमचा गुन्हा तरी काय होता..’

दरम्यान, वडिलांचा मोबाइल खणखणतो. संतापाने बोलतात, ‘त्या अत्याचार्‍याची एकही मूर्ती, छायाचित्र शहरात राहणार नाही. आश्रमात त्यांचे नामोनिशाण राहणार नाही. तिथे शाळा सुरू होईल.’ काही वेळेपूर्वीच वडील जोधपूरहून परतले आहेत. न्यायालयाने आसारामांचा जामीन फेटाळल्यामुळे दिलासा आहे. बोलणे संपवून कपाळावरील घाम टिपत ते म्हणतात, ज्यांना देव मानले तेच भक्तांशी असे कृत्य करू शकतात यावर आजही विश्वास बसत नाही. ‘15 ऑगस्टच्या त्या रात्री स्वत: हजर नसतो तर मुलगी व पत्नीच्या सांगण्यावर कधीही विश्वास ठेवला नसता. 11 वर्षांपासून आम्ही त्यांची तन-मन-धनाने सेवा केली. माझी श्रद्धा ही अंधश्रद्धा होती, याची जाणीव आज होते आहे. दीड वर्षापासून ते आश्रमाच्या उभारणीत व्यग्र होते. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सांभाळणारा थोरला मुलगा म्हणतो, ‘मी अनेकदा त्यांना रोखले. अशा कामांत पैसे, वेळ वाया घालवू नका, असे सांगितले. मात्र समाजासाठी काहीतरी करायची त्यांची इच्छा होती. आसाराम यांचा पर्दाफाश अशा प्रकारे होईल.. या नुसत्या विचारानेही काळजाचा थरकाप उडतो..’


बापूंनी एकदा अचानक विचारले - ‘बोल, तुला किती पैसे हवेत?’ तेव्हा इरादा समजलेला नव्हता
पीडितेच्या वडिलांना जोधपूरमधील 15 ऑगस्टची ती दुपार विसरता येत नाही. ते सांगतात, आत्ममग्न आसाराम अनुयायांना उपदेश देत होते. मध्येच चुटकी वाजवून ते मला म्हणाले, ‘बोल, तुला किती पैसे हवेत? मी श्रद्धेने मान झुकवून म्हणालो, सर्व आपलीच कृपा आहे.’ यावर त्यांचे उत्तर होते, ‘हाच माझा सच्चा भक्त आहे.’ पीडितेचे वडील सांगतात, मला उमगलेच नाही की आसारामांच्या मनात काय चाललंय ते. अचानक ते मला पैसे देण्याची भाषा का करत आहेत? आसारामांचा अध्याय मला स्मृतीतून कायमचा पुसून टाकायचा आहे. मग हताशपणे म्हणतात, ‘मला मुले व कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता आहे.बाहेर पोलिस तरी कुठवर पहारा देतील?’