आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Was Offered Rs 5 Crores To Keep My Mouth Shut I Refused Said Ruby Chouwdhry

5 लाखात ओळखपत्र, तोंड बंद ठेवण्यासाठी 5 कोटी- बनावट IASचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / देहरादून - एका महिलेने आयएएस अधिकारी असल्याचे भासवून उत्तराखंडच्या मसुरी शहरातील प्रतिष्ठित लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीत बिनघोरपणे तब्बल सात महिने मुक्काम ठोकला आणि फरार झाली. विशेष म्हणजे ती फरार झाल्यानंतर तिने बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपी रुबी चौधरी गुरुवारी माध्यमांसमोर आली आहे. रुबीने आरोप केला आहे, की अकादमीतील एका अधिकार्‍याने नोकरीचे आमिष दाखवून तिच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते. तसेच त्याच अधिकार्‍याने महिलेला अकादमीत राहाण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करुन दिले होते. रुबीचा असाही आरोप आहे, की हे प्रकरण उघड झाल्यानंतर तोंड बंद ठेवण्यासाठी मला पाच कोटींची ऑफर देण्यात आली. दुसरीकडे केंद्र सरकारने या प्रकरणी अकादमीचे उपसंचालक सौरभ जैन यांच्याकडून खुलासा मागवला आहे.
रुबी चौधरीचे म्हणणे आहे, की मला अकादमीत प्रशिक्षणासाठी सात महिने ठेवण्यात आले. पण नोकरी दिली गेली नाही. माझी चूक एवढीच होती, की मी अकादमीच्या अधिकार्‍यावर विश्वास ठेवला आणि पाच लाख रुपये दिले. माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर आता हा माझ्या सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. यात जर माझी काही चूक असेल तर मला तुरुंगात पाठवा. रुबीने माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली असली तरी तिने या प्रकरणात कोणाचेही नाव घेतलेले नाही.
काय आहे प्रकरण
अकादमीने रुबी चौधरीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी रुबी सत्यवीरसिंह चौधरी हिने स्वतःला प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करत सप्टेंबर 2014 पासून मसुरीच्या अकादमीत मुक्काम ठोकला होता. या काळात अकादमीत विविध ठिकाणी ती फिरत होती. तिला कोणीही अडवत नव्हते. 27 मार्च 2015 रोजी महिला अचानक बेपत्ता झाली. ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या रुमची तपासणी करण्यात आली, तेव्हा तिथे प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नैनीताल येथील एक ओळखपत्र सापडले, त्यात रुबी एस़डीएम असल्याचे लिहिले होते.