नवी दिल्ली- भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले. काल (मंगळवार) त्यांचे पार्थिव दिल्लीच्या विमानतळावर काही काळासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी भारतीय हवाई दलाचे 96 वर्षीय माजी मार्शल अर्जनसिंग यांनी त्यांना अखेरचा सॅल्युट केला. वयामुळे अर्जनसिंग यांना चालताही येत नाही. तरीही अशा वेळी एका सहकाऱ्याची मदत घेत ते विमानतळावर आले. त्यांनी कलामांचे पार्थिव येण्याची वाट बघितली. त्यानंतर भारताच्या महान नेत्याला भारताच्या झुंझार सेनानीने सॅल्युट केला. तेव्हा देशवासीयांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. अभिमानाने ऊर भरुन आला. हा ऐतिहासिक क्षण अनुभवल्याचे मनोमन समाधान लाभले.
अर्जनसिंग यांना खुर्चीवर बसूनही सॅल्युट करता आला असता. तशी त्यांना सुचनाही करण्यात आली होती. पण कलामांना बसून सलाम करणे अर्जनसिंग सारख्या योध्याला कदापी शक्य नव्हते. कलामांनी आयुष्यात एवढी उंची गाठली आहे, की सॅल्युट करण्यासाठी उभे राहायलाच हवे. तेवढी उंची गाठूनच सॅल्युट करण्याची क्षमता आपल्यात येते. कदाचित हाच विचार अर्जनसिंग यांच्या मनात आला असावा. त्यांनी बसून सॅल्युट करण्याला नकार दिला. उभे राहून आपल्या भावना व्यक्त केल्या.
अर्जनसिंग यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झाला. पुढील स्लाईडवर बघा, एएनआयने शेअर केलेला फोटो...