आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी ३०० भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची तयारी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येमेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची मोहिमे युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी रात्री हवाई दलाच्या दोन विमानांनी ३५८ भारतीय परतले. आणखी ३०० जणांना आणण्याची आता तयारी सुरू झाली आहे.
हवाई तसेच सागरी मार्गे भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेला सरकारने ‘राहत’ असे नाव दिले आहे. मंगळवारी रात्री अदेनमार्गे भारतीयांना आणण्यात आले. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग येमेनमध्ये तळ ठोकून आहेत. दरम्यान, भारतासोबतच श्रीलंकेतीलही नागरिक अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी श्रीलंकेने भारताला मदत मागीतली होती. श्रीलंकेला यात मदत करण्यास भारत तयार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

अगोदर तीन मोहिमा : दहशतवादामुळे भारताला या अगोदरही तीन वेळा आपल्या नागरिकांसाठी तीन वेळा मोहिमा राबवाव्या लागल्या होत्या. युक्रेन, इराक, लिबियामध्ये अशी मोहिम करावी लागली होती. त्यामुळे अनेक भारतीय सुरक्षित परतू शकले होते. भारताने सुरक्षेसाठी नेहमीच यशस्वी प्रयत्न केले आहेत.
येमेनमध्ये हौथींचा प्रभाव वाढला
येमेनमधील हौथी बंडखोरांना हुसकावून लावण्यासाठी सौदी अरबच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय आघाडीने सुरू केलेल्या कारवाईनंतरही येमेनमधील शियापंथीय हौथी बंडखोरांचा प्रभाव वाढतच चालला आहे. गेल्या आठवड्यापासून बंडखोरांच्या तळांवर सौदी अरबचे हवाई हल्ले सुरू असून हौथींनी एडन या दक्षिण येमेनमधील शहराच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली आहे.
येमेनचे अध्यक्ष अब्द रब्बु मन्सूर हादी यांच्या निष्ठावंत संघटना, लष्कर व हौथी बंडखोरांत बुधवारी झालेल्या संघर्षामध्ये १९ जण ठार झाले होते. एडन या अतिमहत्त्वाच्या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही निकराची लढाई सुरू असून पाच दिवसांत शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत.
हौथींना येमेनचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्या निष्ठावंत सैनिकांचेही पाठबळ मिळत आहे. दरम्यान, येमेनचे परराष्ट्र मंत्री रियाध यासीन यांनी हौथींनी चालवलेली आगेकूच चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. एडनवर ताबा मिळवण्यासाठी सुरू असलेली ही लढाई हौथी बंडखोर जिंकले तर सामान्य नागरिकांसाठी ते धोक्याचे ठरेल, असे यासीन म्हणाले.