नवी दिल्ली - दिल्लीतील 33 दूतावासांना चिठ्ठी पाठवून हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्थांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. गुप्तहेर विभाग (आयबी) आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या धमकीची चौकशीही सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीतील 33 दूतावासांना एक चिठ्ठी पाठवून बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या सर्व चिठ्ठय़ा एकाच स्रोताकडून पाठवण्यात आल्या आहेत. धमकीची माहिती मिळताच सर्व दूतावासांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही धमकी किती गंभीर आहे, याची चौकशी आयबी करत आहे. या धमकीनंतर सर्व दूतावासांच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर लावण्याच्या योजनेवर विचार करण्यात येत आहे.