आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगीनंतर आता आइस्क्रीम, सुगंधी दुधावरही FSSAIची निगराणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मॅगी प्रकरणानंतर सरकारने ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच दुग्धजन्य पदार्थ आणि आइस्क्रीमचा उच्च दर्जा राखण्यासाठी नवीन कडक नियमांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा क्षेत्रातील देशातील सर्वोच्च नियामक संस्था एफएसएसएआयने हा निर्णय घेतला आहे.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) सध्या दूध, पनीर, तूप, बटर यावर निगराणी ठेवते. दुधातील फॅटचे प्रमाण लक्षात घेऊन ताजा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दूध, सुगंधी दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेचा विस्तार करण्याची वेळ आली आहे. त्यावर सध्या आम्ही काम करत आहोत. आगामी महिनाभरात यासंबंधीचा आराखडात तयार होऊ शकेल, असे एफएसएसएआयच्या सूत्रांनी सांगितले. दूध आणि दूग्धजन्य पदार्थ यासाठी विशिष्ट नियम तयार करण्याची वेळ आली आहे. आइस्क्रीम आणि सुगंधी दूध यासारख्या पदार्थांवर आता अधिक बारकाईने नजर ठेवली जाणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ५ जून रोजी नेस्लेच्या मॅगीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर नेस्लेला उत्पादन मागे घ्यावे लागले होते.

देशातील खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्यासाठी उपाययोजना

चिनी पदार्थांवर बंदी
गेल्या महिन्यात चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर एफएसएसएआयच्या शिफारशीनंतर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी जून २०१६ पर्यंत चालू राहणार आहे. चीनमधून आयात पदार्थांमध्ये मेलामिन अधिक प्रमाणात होते.

मर्यादा निश्चित
नियामक संस्थेने घरगुती दुग्ध उत्पादनांतील मेलामिनचे प्रमाण गेल्या महिन्यात निश्चित केले आहे. मेलामिनचा वापर प्लास्टिक आणि फर्टिलायझर उद्योगात होतो.

उपाययोजना
मॅगी प्रकरणानंतर देशात फास्ट फूड आणि तयार खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावर खबरदारी म्हणून नियामक संस्थेने ही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यांना सूचना
एफएसएसएआयने मॅगी प्रकरणानंतर सर्व राज्य सरकारांना खाद्य पदार्थांवर कडक निगराणी ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दूषित बाटलीबंद पाणी विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

भेसळीचा मोठा धोका
दुधासारख्या घराघरांत दैनंदिन वापरातील पदार्थांतून होणाऱ्या भेसळीवरून संसदेच्या ग्राहकविषयक समितीकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतरही दूध भेसळीचे प्रकार थांबलेले नव्हते. त्यामुळे अखेर एफएसएसएआयने दुधाच्या दर्जाबाबत आणखी कडक नियम करण्यावर विचार सुरू केला आहे.
मीठ, साखर, फॅटवर नजर
खाद्य पदार्थांत मीठ, साखर, फॅटचे प्रमाण किती ठेवण्यात आले आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एफएसएसएआयने ११ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती अशा पदार्थांच्या विक्रीवर नजर ठेवेल.