नवी दिल्ली - प्रेमाचे प्रतीक आणि जगातील सातवे आश्चर्य असा लौकिक असलेल्या ताजमहालाच्या सौंदर्य संवर्धनासाठी लवकरच मड पॅक ट्रिटमेंट केली जाणार आहे. त्यातून प्रदूषणामुळे पिवळ्या पडलेल्या संगमरवराच्या मूळ शुभ्रपणाला पुन्हा झळाळी मिळेल.
आग्रा परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे ताजमहालाचे चिरे पिवळसर पडले आहेत. त्यामुळे त्याची मूळ झळाळी जणू गायब झाली आहे. म्हणूनच त्याचे नैसर्गिक रूप कायम राखण्यासाठी प्रशासनाने चिखलाचे लिंपण करून उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे, ही पद्धत भारतातील पारंपरिक सौंदर्येपचार पद्धतीवर आधारित असून महिला मुलतानी माती चेहर्यावर लावून त्वचा उजळवतात तशीच ही पद्धत आहे. त्याचप्रमाणे ताजमहालाच्या पृष्ठभागावर मातीचे लिंपण करण्यात येणार आहे. 17 व्या शतकातील या ऐतिहासिक वास्तूवर आतापर्यंत तीन वेळा अशा प्रकारचे उपचार करण्यात आले आहेत.