आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेसातशे गावेः खासदारांच्या ‘आदर्श’ गावांमध्ये पंतप्रधान करणार दारूबंदी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभरापूर्वी खासदारांसाठी आदर्श ग्राम अभियान सुरू केले. किती खासदारांनी या आदर्श गावांसाठी आतापर्यंत वेळ दिला हा संशोधनाचा विषय असला तरी खासदारांच्या प्रस्तावित या सर्वच आदर्श गावांत दारूबंदी करण्यात यावी, अशा सूचना मेदी राज्यांना देणार आहेत.

गेल्या १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येक खासदाराने देशभरातील गावे दत्तक घेऊन ती आदर्श गावे करावीत, असे आवाहन केले होते.

या खासदारांना २०१८ पर्यंत तीन गावांना आदर्श गावे करावीत, अशा सूचना आहेत. पंतप्रधानांच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात खासदारांनी तीन ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या प्रत्येकी एका गावाची निवड केली आहे. यात आतापर्यंत जवळपास साडेसातशे गावे निवडण्यात आली असून या गावांत प्रत्येक घरी शौचालय, सार्वजनिक शौचालये, पिण्याचे स्वच्छ पाणी, गावात रस्ते, उत्तम शाळा, सुरळीत वीजपुरवठा, खेळण्यासाठी मैदान, बगीचा या बाबी साकारायच्या आहेत. गावामध्ये इंटरनेट, संगणक या माध्यमातून तंत्रज्ञानही पोहोचवायचे आहे.

वर्षभरात एकही गाव आदर्श नाही
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध ५० हून अधिक योजनांमधून या आदर्श गावांसाठी निधी उभा करायचा असून याशिवाय कंपनांच्या माध्यमातून मिळणारा सीएसआर फंड व खासदार निधीतील काही भाग आदर्श गावासाठी वापरला जाणार आहे. प्रारंभी भाजप आणि घटक पक्षांनी उत्साहात गावांची नावे केंद्र सरकारकडे पाठवली. मात्र, वर्षभरात एकही गाव आदर्श होऊ शकलेले नाही. काही खासदारांनी त्यांच्या निधीतील रक्कम जाहीर केली; परंतु ती कागदोपत्रीच आहे. ती गावाच्या विकासासाठी अद्याप पोहोचली नाही.

आणखी एक वर्ष संधी
पंतप्रधानांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार पहिले गाव आदर्श करण्यासाठी पुन्हा एक वर्षाचा कालावधी खासदारांच्या हाती आहे; परंतु वर्षभरातील प्रगती समाधानकारक नाही. २०१९ पर्यंत देशातील जवळपास अडीच हजार गावे आदर्श व्हावीत, हे मोदींचे लक्ष्य अाहे. मोदींचा हा प्रयाेग यशस्वी झाल्यास देशातील सरासरी १ कोटी ग्रामीण लोकांचा समावेश अादर्श गावांमध्ये होणार आहे.
निकषांमध्ये दारूबंदी नव्हतीच
आदर्श गावांच्या निकषांमध्ये दारूबंदीचा उल्लेख नसल्याने शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन या गावांमध्ये दारूबंदीचा निर्णय घ्यावा, असे निवेदन दिले. दारूमुळे कुटुंबाची होणारी वाताहत आणि महिलांवर होणारा अन्याय याची आकडेवारी त्यांनी सादर केली. पंतप्रधानांनी ही बाब गांभीर्याने घेत दारूबंदी हा विषय राज्याचा असला तरी जे गाव आदर्श योजनेत असेल तेथे दारूबंदी करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...