नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्ष
सोनिया गांधी यांच्या आयुष्यावरील ‘द रेड साडी’ पुस्तक भारतीय बाजारपेठेत दाखल झाले आहे. पुस्तकात काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
आधीच्या यूपीए सरकारच्या दबावामुळे कादंबरी प्रकाशनास उशीर झाल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. अशा प्रकारचा आरोप लोकशाही आणि देशातील स्वतंत्र न्यायसंस्थेचा अवमान आहे. स्पॅनिश लेखक झेव्हियर मोरो यांचे स्पॅनिश भाषेतील हे पुस्तक २००८ मध्ये भारतात प्रकाशित झाले होते. काँग्रेसने २०१० मध्ये त्यातील वादग्रस्त सामग्रीवरून कायदेशीर नोटीस पाठवली. सिंघवी म्हणाले, त्यांना पुस्तक प्रकाशित करण्याचा हक्क आहे. लेखकाने कोणत्या कारणास्तव पुस्तक आणण्याचा निर्णय घेतला हे कळत नाही. त्यात आक्षेपार्ह मजकूर नसेल तर काही अडचण नाही. मात्र, तसेच असेल तर कायदेशीर कारवाईचा पर्याय खुला आहे.