आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Narendra Modi Become Prime Minister, There Will Be Tension Jairam Ramesh

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास देशात तणाव वाढेल, जयराम रमेश यांचे भाकीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या नरेंद्र मोदींना सर्व स्तरातून विरोध वाढू लागला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यास जातीय तणाव वाढेल, असे भाकीत केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केले आहे. ज्ञानपीठ विजेत्या एका लेखकाने तर तसे झाले तर आपण देश सोडून जाऊ, असा इशारा दिला आहे.


मोदींच्या नावाची घोषणा झाल्यापासून विरोधाचे सूर अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत होते. नावाच्या घोषणेवर अनेकांनी आता संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यात केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांचाही समावेश आहे. मोदींकडे पंतप्रधानपदाची सूत्रे देण्यात आली तर मुझफ्फरनगरसारख्या अनेक दंगली घडून येतील. मोदी संघाचा मुखोटा आहेत. त्यामुळे 2014 ची निवडणूक काँग्रेस व संघ यांच्यात होणार आहे, असे रमेश यांनी सांगितले. काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, यासाठी भाजप वेगळ्या प्रकारे प्रयत्न करू लागले आहे, परंतु काँग्रेस असे कदापिही करणार नाही. खरे तर मोदींचे राजकारण नेहमीच जातीय ध्रुवीकरणाचे राहिले आहे. मुझफ्फरनगर येथील दंगल हा केवळ ट्रेलर आहे. एक मैलाचा दगड आहे. भविष्यात आणखीही मैलाचे दगड तयार केले जातील. उत्तर प्रदेशने दंगल पाहिली आहे. उत्तर प्रदेश, बिहार ही देशाच्या राजकारणातील महत्त्वाची राज्ये आहेत. या राज्यांमध्ये अशा दंगली उसळू शकतात, असा इशारा त्यांनी दिला.


तर देश सोडेन- अनंतमूर्ती
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईल, असा निर्वाणीचा इशारा कन्नडचे ज्ञानपीठ विजेते लेखक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांनी दिला आहे. मोदींकडे हे पद आले तर ते लोकांमध्ये भय निर्माण करण्याचे काम करतील. अशा परिस्थितीत देशात राहणे मला तरी आवडणार नाही. ते एका कार्यक्रमात बोलत होते. आपल्याकडे नेहरूंसारख्या महान व्यक्तींनी हे पद भूषविले आहे. नेहरूंनी तुरुंगात असताना डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचा महान ग्रंथ लिहिला. नरसिंह रावदेखील विद्वान होते. या पदासाठी अनेक महान लोक आहेत. त्यामुळे मोदी यांच्यासारख्या व्यक्तींचीच निवड का केली जात आहे, असा संताप अनंतमूर्ती यांनी व्यक्त केला.


उद्योग जगताच्या दबावामुळे निवड
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपच्या माजी सहकारी पक्ष राहिलेल्या जनता दल संयुक्तनेदेखील मोदींच्या निवडीवर टीकास्त्र सोडले आहे. उद्योगपतींच्या दबावापुढे झुकून भाजपने मोदींची निवड केली आहे, असा आरोप जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी केला आहे. भाजपने या निवडीतून आपली पूर्वीचे तत्त्वज्ञान मांडले आहे, असे यादव म्हणाले.


अमित शहा बिहार दौ-यावर
नरेंद्र मोदी यांचे विश्वासू अमित शहा 21 सप्टेंबरला बिहारच्या दौ-यावर जाणार आहेत. शहा या दौ-यात राजकीय व्यूहरचना आखणार आहेत. 27 ऑक्टोबर रोजी राज्यात मोठी रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर मोदी यांचे भाषणही होणार आहे. राज्यात जदयूसोबतची आघाडी संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर शहा यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो.