आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IIT Fee Hiked By 122%; Waived For SC ST, Disabled

IIT शुल्क 122 टक्के वाढले; 90,000 रुपयांहून थेट 2 लाख रुपये करण्याचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयआयटीमध्ये शिक्षण घेणे आता महाग झाले आहे. केंद्र सरकारने आयआयटीमधील स्नातक पाठ्यक्रमांचे वार्षिक शुल्क ९०,००० रुपयांहून २ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला. शुल्कवाढीचे हे प्रमाण तब्बल १२२ टक्के आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून शुल्कवाढ लागू होईल.

अनुसूचित जाती- जमाती, अपंग आणि १ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मात्र हे शुल्क शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (एचआरडी) घेतला आहे.
आयआयटीच्या उच्चस्तरीय समितीने दिलेल्या प्रस्तावावर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयआयटी पाठ्यक्रमांच्या शुल्कवाढीचा निर्णय घेतला. मंत्रालयाने आयआयटीच्या स्नातक पाठ्यक्रमांचे शुल्क ९०,००० रुपयांहून २ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला. या शुल्कवाढीचा शासनादेश लवकरच जारी होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. ज्या विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये आधीच प्रवेश घेतलेला आहे, त्यांना जुन्याच शुल्क रचनेनुसार शुल्क भरावे लागेल.
नवीन शुल्क रचना फक्त आयआयटीत नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.
आयआयटी-रुरकीचे अध्यक्ष अशोक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची गेल्या महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत आगामी शैक्षणिक वर्षापासून शिकवणी शुल्कात तिप्पट वाढीचा म्हणजेच सध्याचे ९०,००० रुपये वार्षिक शुल्क ३ लाख रुपये करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र, मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी या देशातील सर्व आयआयटीचे सर्वोच्च अधिकार मंडळ असलेल्या आयआयटी परिषदेच्या अध्यक्ष असून त्यांनी शुल्कवाढीबाबतचा अंतिम निर्णय घेतला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईत झालेल्या आयआयटीच्या स्थायी समितीत तिप्पट शुल्कवाढीचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडण्यात आला होता. मात्र, तो आयआयटीच्या संचालकांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीकडे पाठवण्यात आला होता.
कुठे-कुठे आहे आयआयटी
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) उच्च शिक्षण देणाऱ्या स्वायत्त संस्था आहेत. देशातील २३ आयआयटी पुढील शहरांत आहेत- भिलई, चेन्नई, दिल्ली, धनबाद, धारवाढ, गोवा, गुवाहाटी, जम्मू, कानपूर, खरगपूर, मुंबई, रुरकी, भुवनेश्वर, गांधीनगर, हैदराबाद, इंदूर, जोधपूर, मंडी, पलक्काड, पाटणा, रोपर, तिरुपती आणि वाराणसी.