आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WHAT NEXT: राज्‍यसभेत मजबूत होणार भाजप, स्‍वत:च्‍या पसंतीचा राष्‍ट्रपती बनवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- पाच राज्‍यांच्‍या विधानसभा निवडणुकांमध्‍ये भाजपाला दणदणीत विजय मिळाला आहे. यामुळे राज्‍यसभेत अल्‍पमतात असलेल्‍या भाजपची स्थिती चांगलीच मजबुत होणार आहे. संसदेच्‍या या वरिष्‍ठ सभागृहात बहुमत नसल्‍यामुळे अनेक विधेयकांच्‍या मंजुरीसाठी भाजपाला विरोधकांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र उत्‍तर प्रदेश आणि उत्‍तराखंडमध्‍ये भाजपच्‍या विधानसभेच्‍या जागांमध्‍ये भरघोस वाढ झाल्‍यामुळे राज्‍यसभेतील जागांचे गणितही बदलणार आहे. तज्‍ज्ञांच्‍या मते राज्‍यसभेत स्‍वत:च्‍या मर्जीचा राष्‍ट्रपती ठरवण्‍याइतपत भाजपची सदस्‍यसंख्‍या वाढू शकते. 
 
कसा होणार राष्‍ट्रपती निवडणुकीवर परिणाम?
- लोकसभा आणि राज्‍यसभेतील सर्व खासदार, देशातील सर्व विधानसभांमधील आमदार राष्‍ट्रपतींच्‍या निवडणुकीत मतदान करतात.   
- ही निवडणूक ज्याप्रकारे घेतली जाते त्यात प्रत्येक खासदार आणि आमदाराच्या मताची एक किंमत ठरलेली असते. ही किंमत (व्होट व्हॅल्यू) उत्तर प्रदेशच्या आमदारांची सर्वात जास्त आहे तर ईशान्य भागातील छोटेखानी राज्यातील आमदारांची सर्वात कमी आहे. त्‍यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या आमदारांच्या मताचे सर्वाधिक महत्त्व असते. म्‍हणूनच उत्‍तरप्रदेशची निवडणूक राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडीसाठी तसेच संसदेच्‍या दोन्‍ही सभागृहात सरकारचे कामकाज सुरळीतपणे चालु ठेवण्‍यासाठी महत्‍त्‍वाची असते.  

कशी ठरते मतांची किंमत?
- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रत्येक राज्यातील आमदार आणि खासदारांच्‍या मताची किंमत वेगवेगळी असते. त्यासाठी लोकसंख्या हा पाया धरला गेला आहे. त्याच आधारावर उत्तर प्रदेश मधल्या आमदारांच्या मताचे मूल्य गोव्याच्या आमदाराच्या मतापेक्षा जास्त आहे. खासदारांचे मुल्‍य आमदारांच्‍या मुल्‍यांपेक्षा अधिक असते. 
 
असे आहे गणित 
- राष्‍ट्रपतींच्‍या निवडणुकीमध्‍ये एकूण 10,98,882 इतक्‍या व्‍होट व्‍हॅल्यूंचे मतदान होते.  
- त्‍यापैकी 5.49 लाख इतके व्होट व्हॅल्यू राष्‍ट्रपती निवडून येण्‍यासाठी आवश्‍यक असतात. 
- भाजपाजवळ निवडणुकीआधी 4.57 लाख मते होती. म्‍हणजेच आपल्‍या पसंतीचा राष्‍ट्रपती निवडून आणण्‍यासाठी त्‍यांना फक्‍त 92 हजार मतांची गरज होती. 
- पाच राज्‍यांमध्‍ये जिंकलेल्‍या विधानसभेच्‍या जागांमुळे भाजपच्‍या व्‍होट व्‍हॅल्‍युमध्‍ये 96508 इतकी वाढ झाली आहे. यातील फक्‍त उत्‍तरप्रदेशमधील मतांची किंमत 67600 आहे. 
- यामुळे भाजपाच्‍या पसंतीचा राष्‍ट्रपती बनणे आता जवळपास निश्चित झाले आहे. 
- लोकसभाअध्‍यक्षा सुमित्रा महाजन, सुषमा स्‍वराज आणि वेंकैया नायडू राष्‍ट्रपतीपदाच्‍या खुर्चीसाठी सध्‍या सर्वात पुढे आहेत.  
- मात्र उपराष्‍ट्रपतींच्‍या निवडणुकीवर या निकालांचा काहीही परिणाम होणार नाही. कारण उपराष्‍ट्रपतीच्‍या निवडीसाठी फक्‍त लोकसभा आणि राज्‍यसभेतील खासदारांचे मतदान होते.

राज्‍यसभेमध्‍ये मजबुत होणार भाजप 
- एप्रिल 2018मध्‍ये राज्‍ससभेतून 58 खासदार निवृत्‍त होत आहेत. यातील 10 सदस्‍य उत्‍तरप्रदेशचे आहेत तर 1 सदस्‍य उत्‍तराखंडमधील आहे. 
- उत्‍तरप्रदेश‍ विधानसभा निवडणूकीमध्‍ये भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्‍यामूळे राज्‍यसभेच्‍या या खाली होणाऱ्या जागा जिंकण्‍याची संधी भाजपला आहे. म्‍हणजेच राज्‍यसभेत भाजपच्‍या अकरा जागा 2019 पूर्वी वाढू शकतात.  
- राज्‍यसभेत एकूण 245 जागा आहेत. यातील 74 जागा एनडीएकडे (भाजप 56) आणि 65 जागा काँग्रेसआघाडीजवळ (काँग्रेस 59)आहेत. इतर पक्षांकडे 106 जागां आहेत. म्‍हणजेच राज्‍यसभेमध्‍ये एनडीएकडे काँग्रेसआघाडीपेक्षा जास्‍त संख्‍याबळ आहेत. मात्र बहुमतासाठी (123) एनडीए अजूनही खूप मागे आहे. 
-  याचा भाजपला होणारा सर्वात मोठा फायदा म्‍हणजे राज्‍यसभेत काँग्रेसपेक्षा भाजपच्‍या जागा वाढल्‍यामुळे महत्‍त्‍वाची विधेयके मंजूर करुन घेण्‍यासाठी भाजपला जास्‍त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच राष्‍ट्रपतीही आता त्‍यांच्‍या मर्जीचे असणार आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...