आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दर नियंत्रण : 2000 टन कांदा आयात करणार, शेतकऱ्यांकडून 12 हजार टन खरेदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतातील विविध भागांत कांद्याचे दर वाढले आहेत. सलग होत असलेल्या दरवाढीमुळे सरकारने आधीच उपाययोजना करण्याची तयारी दाखवली आहे. किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच बाजारातील पुरवठा वाढवण्यासाठी आयातीव्यतिरिक्त स्थानिक शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जाणार आहे.


 किमतीत होत असलेली वाढ थांबवण्यासाठी तसेच पुरवठा वाढवण्यासाठी सरकारी कंपनी एमएमटीसी २००० टन कांदा आयात करणार असल्याची माहिती अन्न व ग्राहक व्यवहार संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी दिली. इतकेच नाही तर नाफेड आणि एसएफएसी शेतकऱ्यांकडून १२ हजार टन कांद्याची खरेदी करणार आहे. 


कांद्यावर ७०० डॉलर प्रतिटन निर्यात शुल्क लावण्याची शिफारस वाणिज्य मंत्रालयाला केली असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे कांद्याची निर्यात कमी होईल. पुरवठा कमी असल्याने किरकोळ बाजारात कांद्याचे दर ५० ते ६५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.


पासवान यांनी सांगितले की, नाफेडमार्फत १० हजार टन आणि एसएफएसीमार्फत सुमारे २००० टन कांद्याची सरळ शेतकऱ्यांकडून  खरेदी करण्यात येणार आहे. हा कांदा ज्या ठिकाणी जास्त मागणी आहे त्या ठिकाणी पुरवठा केला जाईल.


कांद्याची निर्यात कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे पासवान यांनी सांगितले. यासाठी कांद्याच्या निर्यातीवर किमान निर्यातमूल्य (एमईपी) लावण्याची शिफारस वाणिज्य मंत्रालयाला केली असल्याचे ते म्हणाले. या दरम्यान कांद्याच्या निर्यातीवर ७०० ते ८०० रुपये प्रति टन एमईपी लावण्याचा विचार वाणिज्य मंत्रालय करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबंधी मंत्रालयाने निर्यातदार आणि इतर पक्षांकडून सल्ला मागवला आहे. एमईपी दर म्हणजे ज्या दरापेक्षा कमी किमतीवर संबंधित वस्तूंची निर्यात करता येत नाही.

 

निर्यातीत ५६ टक्के वाढ
भारतातून कांदा निर्यात या वर्षी एप्रिल ते जुलैदरम्यान ५६ टक्क्यांनी वाढून १२.२९ लाख टन झाली आहे. २०१६-१७ मध्ये या समान कालावधीचा विचार केल्यास त्या वेळी देशातील कांदा निर्यात ७.८८ लाख टन झाली होती.

बातम्या आणखी आहेत...