आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In 2009 Congress Was Sat On Opposition Bench, Janardhan Dwivedi Advise To Congress

सन 2009 मध्ये काँग्रेसने विरोधी बाकावर बसायला हवे होते, जनार्दन द्विवेदी यांचा घरचा आहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 2009 मध्ये काँग्रेसने सत्तेवर येण्याऐवजी विरोधी बाकावर बसायला हवे होते, असे मत पक्षाचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी व्यक्त केले आहे. यूपीए-2 चे नेतृत्व करण्याचा निर्णय धोरणात्मकदृष्ट्या प्रश्नचिन्ह लावणारा ठरल्याचेही द्विवेदी यांना वाटते. आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसला जड जाणार, अशी चर्चा असताना ज्येष्ठ नेत्याकडून असे अवसानघातकी वक्तव्य होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच पराभवाचा धसका घेतल्याचे दिसून येत आहे.
आघाडीच्या सरकारला अनेक प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात, हे मान्य आहे. परंतु काँग्रेसने दूरदृष्टी ठेवून विरोधी पक्षाच्या बाकावर बसायला हवे होते. तसा निर्णय झाला असता तर पक्षाला पुढच्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवता आली असती. 2004 च्या तुलनेत 2009 मध्ये पक्षाचा वैयक्तिक पाठिंबा वाढला होता. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नव्हती. त्या वेळी इतरांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यायला हवी होती; जेणेकरून पक्षाला एका निकोप विरोध पक्षाची भूमिका वठवता आली असती, असे द्विवेदी यांनी एका मुलाखतीमध्ये मोकळेपणाने कबुल केले.
आघाडी, दुबळे नेतृत्व आणि दहा वर्षांपासून असलेल्या सरकारविरोधी असंतोषाच्या समस्यांनी काँग्रेस सध्या ग्रासलेली असतानाच द्विवेदी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून हे मत मांडण्यात आले आहे. एखादी जुनी गोष्ट पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन प्रयोग करू शकत नाहीत. 2009 मध्ये काँग्रेसने हे करायला हवे होते. म्हणूनच काँग्रेसने 2009 मध्ये असा निर्णय घेणे अपेक्षित होते. किंबहुना आव्हानांनादेखील तोंड देता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
यूपीए-2 च्या कामगिरीवर नाराज आघाडीसंबंधी काय म्हणाले?
सध्याच्या परिस्थितीत आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी लागणारा संयम कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. नवीन आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लागणारी क्षमतादेखील दिसून येत नाही.
कामगिरीबद्दल : दहा वर्षे सत्तेवर राहणा-या कोणत्याही आघाडी सरकारला लोकांकडून काही ना काही प्रतिक्रियांना सामोरे जावे लागणारच. काँग्रेसने मध्यममार्ग निवडला. किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आतापर्यंत देशाच्या इतिहासात यूपीएएवढे यश एकाही आघाडी सरकारला आलेले नव्हते. ही बाब आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची आहे.
‘आप’बद्दल : आम आदमी पार्टीचा उदय म्हणजे ‘इशारा आणि आव्हान’ होय. व्यवस्था आणि महत्त्वाच्या पक्षांबद्दलच्या रागातूनच आम आदमी पार्टीचा उदय झाला आहे. परंतु यातून अराजकाशिवाय काहीही निर्माण होणार नाही. ही काही आदर्श पद्धती होऊ शकत नाही.
प्रादेशिक नेत्यांवर...
गेल्या दोन-तीन दशकांत प्रादेशिक नेत्यांचे पेव फुटले आहे. खरे तर त्यांचे परदेशात शिक्षण झालेले नसते किंवा त्यांची इंग्लिशदेखील फारशी चांगली नसते. त्याचबरोबर तंत्रज्ञानासंबंधीही त्यांच्यात फार हुशारी नाही; तरीदेखील त्यांना लोकांचा पाठिंबा आहे.
अण्णा द्रमुक-भाकपची युती
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय अण्णा द्रमुक (एआयएडीएमके) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय) रविवारी आघाडीची घोषणा केली. अण्णा द्रमुकच्या प्रमुख व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आपल्या निवासस्थानी आघाडी जाहीर केली. या वेळी भाकपचे नेते ए. बी. वर्धन आणि सुधाकर रेड्डी उपस्थित होते. जयललिता यांच्या मताला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. निवडणुकीत आम्हाला यश मिळेल, असा विश्वास वर्धन यांनी व्यक्त केला. जयललिता यांना पंतप्रधानपदासाठी पुढे केले जाईल का, या प्रश्नावर वर्धन यांनी यश मिळाल्यानंतर सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. यादरम्यान आमच्यापुढे 40 जागा जिंकण्याचे मुख्य ध्येय असल्याचे जयललिता म्हणाल्या.
तिस-या आघाडीसाठी प्रयत्न
अंतर्गत मतभेद असले तरीही काँग्रेस-भाजपविरोधी पक्षांच्या मदतीने तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी जदयू प्रयत्न करणार असल्याचे या पक्षाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी सांगितले. संपुआविरोधी आघाडी फोडण्यात भाजप जबाबदार असल्याचा आरोप जदयूने केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी वैचारिक मुद्द्यावर भाजपशी संबंध तोडण्यात आल्याने त्यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पक्षापक्षांतील मतभेदानंतरही निवडणुकीनंतर तिसरी आघाडी उदयास येईल. यामध्ये जदयूची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असे यादव म्हणाले.