आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In Last Leg Of Campaign, AAP Chief Arvind Kejriwal Mounts Attack On Bharatiya Janata Party

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपकडे सरकार, कौशल्य; आमच्यासोबत ईश्वर : अरविंद केजरीवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार गुरुवारी सायंकाळी संपला. शेवटच्या दिवशी आम आदमी पार्टीचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नकारात्मक प्रचाराच्या मुद्द्यावर भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, भाजपकडे सरकार, कौशल्य आहे. मंत्री आहेत. आमच्याकडे मात्र ईश्वर आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल भाजप नेते शाहनवाज हुसेन म्हणाले, केजरीवाल यांचा लोकांवर विश्वास राहिला नसल्यामुळे त्यांनी तो ईश्वरावर ठेवला आहे.

केजरीवाल यांनी गुरुवारी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील मंदिर मार्गापासून प्रचाराची सुरुवात केली. दुसर्‍यांवर हल्ले करणे हा भाजपचा धर्म आहे. आम्ही मात्र सत्याच्या मार्गावर चालत आहोत. हा एक अद्भुत आणि पवित्र अनुभव आहे. त्याआधी त्यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले की, महाभारताच्या युद्धात दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाकडे सैन्य मागितले होते. अर्जुनाने कृष्णाकडे पाठिंबा मागितला होता.

केजरीवालांकडे प्रशासकीय अनुभव नाही : किरण बेदी
मला ४० वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. दुसरीकडे खोटेनाटे बोलणार्‍या व्यक्तीकडे (केजरीवाल) केवळ पाच वर्षांचा अनुभव आहे. ते फरार असून पुन्हा जबाबदारीपासून पळून जातील. माझ्याकडे दोन मुद्दे आहेत. मग तो व्यापारी असो की सफाई कर्मचारी. अपप्रचार, पसरवल्या जाणार्‍या अफवा खोट्या आहेत.

राहुल यांचा सुलतानपूर मजरामध्ये रोड शो
गेल्या आठवड्यात दक्षिण, पूर्व आणि मध्य दिल्लीतील यशस्वी सभेनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वायव्य दिल्लीतील सुलतानपूर मजरा भागात रोड शो केला. राहुल, राहुल आणि अब की बार गांधी की आंधी यांसारख्या घोषणा कार्यकर्ते देत होते. याशिवाय राहुल यांनी अन्य भागांत पक्षाचा प्रचार केला.

डेरा सच्चा सौदाचा पाठिंबा
हरियाणानंतर डेरा सच्चा सौदा पंथाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली. या निर्णयाला डेरा प्रमुख गुरमित राम रहिम सिंह यांचा चित्रपट "मेसेंजर ऑफ गॉड'च्या प्रदर्शनाशी जोडून पाहिले जात आहे. सेन्सॉर बोर्डाने त्यास परवानगी दिली आहे. मात्र, प्रमाणपत्र जारी करण्यात आले नाही. दिल्लीत आपले २० लाख समर्थक असून त्यातील १२ लाख मतदार असल्याचा दावा डेरा सच्चा सौदाने केला आहे. साधारण ३० ते ३५ जागांच्या निकालावर डेरा समर्थक परिणाम करू शकतात. डेरा समर्थक केवळ भाजपला मतदान करणार नाहीत, तर घरोघरी जाऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन करतील. डेराचे प्रवक्ते म्हणाले, गुरमित राम रहिम सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत, स्त्री भ्रूणहत्या आणि अमली पदार्थविरोधी अभियानाने प्रभावित झाले.

केजरीवालांचे नाव वगळणार नाही : न्यायालय
‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या नेत्या किरण वालिया आणि एक स्वयंसेवी संस्था मौलिक भारत ट्रस्टने केजरीवाल यांचे नाव चुकीने दिल्लीच्या मतदार यादीत समाविष्ट झाल्याचे म्हटले होते. यावर न्या. विभू बाखरू म्हणाले, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही. निवडणुकीनंतर या याचिकेवर निकाल दिला जाईल.