आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Poll Season, Parties Hire Detectives To Keep Eye On Their Activists

विरोधी उमेदवारावर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निवडणुकीच्या रणधुमाळीत खासगी गुप्तहेर संस्थांचा धंदाही तेजीत आहे. आपल्याविरोधात उभा ठाकलेला उमेदवार आणि त्याच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी गुप्तहेरांचा शिताफीने वापर केला जात आहे. यापूर्वी राजकीय हेरगिरी किंवा मत व्यवस्थापनासंबंधीची माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेरांचा वापर होत असला तरी या वेळी त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्याकडून मागण्यात येणार्‍या माहितीचे स्वरूप बदलले आहे.

नवी दिल्लीतील स्ल्यूथ्स इंडिया या गुप्तहेर संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक नमन जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राजकीय पक्षांनी हेरगिरी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. मात्र या राजकारण्यांचे नाव जाहीर करणे त्यांच्या तत्त्वात बसत नाही. खासगी गुप्तहेर संघटनेचे अध्यक्ष कुंवर विक्रम सिंग यांच्या मते, या वेळी स्पर्धक उमेदवारावर लक्ष ठेवण्याऐवजी मत व्यवस्थापनावर जास्त भर दिला जात आहे.

व्यापक स्वरूपाची हेरगिरी
2009 च्या निवडणुकांमध्ये स्पर्धक उमेदवारावर नजर ठेवण्यासाठी गुप्तहेरांचा वापर करण्यात आला होता. मात्र यंदा विरुद्ध उमेदवाराची ‘मोडस ऑपरेंडी’ तसेच मतदान केंद्रांबाबत माहिती, मतदारांच्या अपेक्षा, उमेदवाराची ध्येयधोरणे समजून घेण्यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत.

हेरांवर तीन प्रमुख जबाबदार्‍या
बड्या राजकारण्यांकडून गुप्तहेरांवर मुख्यत्वे तीन प्रकारच्या हेरगिरीची जबाबदारी सोपवली जात आहे. यापैकी पहिली म्हणजे विरोधी उमेदवार जिंकण्याची किती शक्यता आहे, हे तपासून पाहणे. यात उमेदवाराची लोक प्रियता आणि त्याच्या धोरणांचा अभ्यास केला जात आहे. दुसरे म्हणजे, काही पक्ष आपल्या कार्यकर्त्यांवरच नजर ठेवण्यासाठी गुप्तहेरांचा वापर करत आहेत आणि विरोधी पक्षाचे प्रचारतंत्र आणि इतर डावपेच याची बित्तमबातमी ठेवण्यासाठी गुप्तहेरांची जबाबदारी असते.

कार्यकर्त्यांवरही अविश्वास : कार्यकर्तेच आपल्या पाठीत खंजीर खुपसत नाहीत ना किंवा आपली माहिती शत्रुपक्षापर्यंत पोहोचवत नाहीत ना, ही खबरदारी घेतली जात आहे. विरोधी पक्षातर्फे प्रचारासाठी कोणते तंत्र वापरले जात आहे, हे विविध पक्षांना माहिती करून घ्यायचे आहे. यासंबंधीची माहिती देण्यासाठी गुप्तहेरांसमोर 5 ते 25 लाखांचे बजेट ठेवले जात आहे

गुप्तहेर संस्थांचा प्रामाणिकपणा
विशेष म्हणजे एखाद्या पक्षाकडून किंवा उमेदवाराकडून एकदा काम मिळाल्यानंतर संबंधित गुप्तहेर संस्था किंवा खासगी गुप्तहेर आपल्या ग्राहकाशी प्रामाणिक राहतात तसेच विरोधी पक्ष किंवा उमेदवाराचे काम स्वीकारत नाहीत.