आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Independence Day Speech: Elect A Stable Govt, Pranab Mukherjee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगामी निवडणुकीतून स्थिर सरकार द्या : राष्ट्रपती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शासन व्यवस्था तसेच सरकारी कार्यालयांतील कामकाजावरून देशात असलेले निराशेचे वातावरण दूर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. आर्थिक स्थैर्य व सुरक्षेसाठी जनतेने आगामी निवडणुकीतून स्थिर सरकार निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. 67 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते.

राष्ट्रपतींनी दारिद्र्य निमुर्लनासाठी प्रयत्न आणि आर्थिक सुधारणा कार्यक्रम सुरूच ठेवण्यावर भर दिला. ते म्हणाले, दारिद्र्याच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी देशात गुणवत्ता, कार्यक्षमता आणि साधन संपत्ती अस्तित्वात आहे. लोक कल्याणकारी योजनांचा लाभ खर्‍या लाभार्थीना मिळायला हवा. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या थेट खात्यात सबसिडी योजनेमुळे प्रशासनात पारदर्शकता येऊन साधन सामग्रीचा अपव्यय टाळता येईल.

सरकारला आरसा दाखवला : ‘देशात शासन व्यवस्था, कार्यालयांतील कामकाजात निराशाजनक वातावरण आहे. आपली विधीमंडळे कायदा तयार करणार्‍या मंचापेक्षा गोंधळाचे आखाडे होताना दिसत आहेत. भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा आहे. अकार्यक्षमता व औदासिन्यामुळे देशातील अनमोल साधन संपत्ती नष्ट होत आहे. यामुळे आपल्या समाजातील ऊर्जा घटत आहे. त्याला आळा घालायला हवा.’

अशा पद्धतीची व्यवस्था हवी : ‘संसदेत वादविवाद आणि चर्चा व्हावी मात्र, त्याचबरोबर निर्णय झाले पाहिजेत. विनाविलंब न्याय देणारी न्यायपालिका असावी. महान वारशाची ओळख मिळवून देणार्‍या परंपरंप्रती समर्पण देणारे नेतृत्व असावे.’
संयमालाही मर्यादा असते

संयमाला मर्यादा असते. भारत कायम शेजारी देशांची चांगले संबंध ठेवण्याचे प्रयत्न करतो. असे असताना सीमेवर तणाव आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रबंदीचे उल्लंघन होत आहे. अशा स्थितीत राष्ट्रीय सुरक्षा व देशाचे अखंडीत राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.

स्वातंत्र्य दिन यूट्यूबर लाइव्ह
67 वा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव तसेच पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचे यूट्यूब व दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर होणारा ध्वजारोहण समारंभ गुरुवारी सकाळी 6.25 पासून दाखवला जाणार आहे. यूट्यूब युजर्सना या समारंभाची क्षणचित्रे मिळवता येतील. यूट्यूबमार्फत जगभरातील भारतीयांना स्वातंत्र्योत्सवात सहभागी होता येईल. सध्याच्या पिढीचा विचार करता या माध्यमाचा मोठा उपयोग होईल, असे दूरदर्शनचे महासंचालक त्रिपूर्ती शरण यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.