आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India 13 Soldiers Released In 5 Hours From Nepal

नेपाळकडून भारताच्या १३ जवानांची ५ तासांनी सुटका, तस्करांचा केला होता पाठलाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू/नवी दिल्ली- नेपाळच्या पोलिसांनी भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) १३ जवानांना ताब्यात घेतल्याने भारत आणि नेपाळमध्ये रविवारी पुन्हा तणाव निर्माण झाला. मोठ्या प्रयत्नांनंतर पाच तासांनी या जवानांची सुटका करण्यात यश मिळाले.

ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजता घडली. एसएसबीच्या गस्ती पथकाला बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील अंबारी-केचना सीमेवर डिझेल तस्करांच्या संशयास्पद हालचाली आढळल्या. कॉन्स्टेबल रोशन आणि रामप्रसाद हे तस्करांचा पाठलाग करत नेपाळच्या सीमेतील खुंटनमणी या गावात ५० मीटर आतपर्यंत घुसले.नेपाळच्या सीमेत पोहोचताच तस्करांनी या ग्रामस्थांच्या मदतीने एसएसबीच्या जवानांना घेरले आणि त्यांना नेपाळी पोलिसांच्या ताब्यात दिले. आपल्या दोन जवानांचा शोध घेत एसएसबीचे आणखी ११ जवान केचना ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी त्यांनाही बंधक बनवले.

नेपाळमध्ये नवे संविधान लागू झाल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले आहेत. मूळ भारतीय वंशाचा मधेसी समुदाय आंदोलन करत आहे. भारतातून नेपाळला जाणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक त्यांनी रोखली आहे. त्यामुळे नेपाळमध्ये या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.

चार दिवसांपूर्वीही झाला होता हल्ला
चार दिवसांपूर्वी बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील भीमनगर येथे अत्यावश्यक वस्तूंची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एसएसबीच्या जवानांवर संतप्त जमावाने हल्ला केला होता. जवानांच्या रायफली हिसकावण्याचाही प्रयत्न झाला होता. त्यामुळे जवानांना हवेत गोळीबार करावा लागला होता.

गोळीबार स्वसंरक्षणासाठीच : भारत
एसएसबीचे जवान आमच्या हद्दीत १०० मीटरपर्यंत घुसले आणि त्यांनी नेपाळच्या ४ नागरिकांवर गोळीबार केला होता, असा आरोप नेपाळी अधिकाऱ्यांनी केला, पण भारतीय अधिकाऱ्यांनी तो फेटाळला. जवानांनी भारतीय हद्दीत स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, असे स्पष्ट करण्यात आले. नेपाळचे अधिकारी केशराज ओन्ता यांनी एसएसबीचे प्रमुख बी. डी. शर्मा यांना या घटनेची माहिती दिली. दोघांमध्ये थेट संभाषण झाले आणि पाच तासांतच दोघांनीही हा पेच संपवला, अशी माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत दिली.

सर्वांची सुटका
‘सर्व जवानांना भारतीय सीमेत आणण्यात आले आहे. कोणत्याही जवानाला शारीरिक इजा झालेली नाही.’
- बी. डी. शर्मा, एसएसबी प्रमुख

कारण विचारले
‘चौकशीनंतर एसएसबी जवानांना सोडले. येण्याचे कारण त्यांना विचारले गेले.’
- डंबरूप्रसाद निरौला, नेपाळचे झापा जिल्हा सहमुख्य अधिकारी

याआधीही तस्करी
^‘शनिवारी रात्री नेपाळात तस्करी होणारे १५०० लिटर डिझेल पकडले होते. यामुळे जवान सतर्क होते.’
- दीपककुमार, अधिकारी

भारतीय चॅनलवर नेपाळमध्ये बंदी
दरम्यान, नेपाळमध्ये भारताला होत असलेला वाढता विरोध आणि तोडफोड पाहता नेपाळच्या केबल ऑपरेटर्सनी रविवारी सर्व भारतीय टीव्ही चॅनलवर बंदी घातली.