अहमदाबाद/नवी दिल्ली/लेह - चीनने त्यांची दुहेरी चाल सोडलेली नाही. एकीकडे त्यांचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मैत्रीचा हात पुढे करत आहेत तर, दुसरीकडे लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. जवळपास एक हजार चीनी सैनिकांनी भारतात घुसखोरी केली आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या फ्लॅग मिटींगनंतरही रात्री उशिरापर्यंत तोडगा निघू शकलेला नाही. त्याआधी मंगळवारी रात्री 100 चीनी सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरी केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात भारताने त्या ठिकाणी
आपली कुमक वाढविली आहे. चीनचे शेकडो सैनिक आणि आणि नागरिक 10 दिवसांपासून लडाखच्या डेमचोक भागात तंबू ठोकून आहेत.
मंगळवारी रात्री काही चीनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतल्याची माहिती होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच आणखी 100 चीनी सैनिक चुमारच्या पाहाडी मार्गाने परत आले. चीनी सैनिक आणि नागरिक भारतीय हद्दीत सुरु असलेल्या नहरच्या कामाला विरोध करत आहेत. दोन्ही देशांदरम्यान घुसखोरीवरुन ब्रिगेडिअर स्तरावरील बैठक झाली त्यानंतरही चीनी सैन्य मागे फिरण्यास तयार नाही.
पत्नी पेंग लियॉन यांच्यासह जिनपिंग यांचे बुधवारी दुपारी एअर चायनाच्या विशेष विमानाने आगमन झाले. हा तीन दिवसांचा भारत दौरा असून त्याची गुजरातपासून सुरुवात झाली. जिनपिंग यांना पोलिसांकडून सलामी देण्यात आली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना
नरेंद्र मोदी यांनी कम्युनिस्ट नेतृत्वाखालील चीनला अनेक वेळा भेट देऊन सुदृढ संबंध प्रस्थापित केले होते. आता पंतप्रधान म्हणून काम करताना मोदींनी हे संबंध आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिनपिंग यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचंड कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुसरीकडे पाकिस्तानशी असलेले सख्य, सरहद्दीवरील कुरापतींमुळे दोन्ही देशांतील तणाव या दौऱ्याने निवळणार आहे; परंतु तीन दिवसांच्या भेटीत जिनपिंग मैत्रीच्या कितीही आणाभाका घेणार असले तरी आपली वचने ते कितपत पाळतील, यावर प्रश्नचिन्ह असल्याचे दिसून येते.
हिंदी चिनी भाई-भाई की...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हयात हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे स्वागत केले. त्या वेळी हस्तांदोलनासाठी सुरुवातीला मोदींनी हात पुढे केला.
गुजरातशी झाले तीन करार
गाँगझू आणि अहमदाबाद ‘सिस्टर सिटी’ म्हणून विकसित करण्यासंबंधी दोन्ही प्रांतांत सहमती करार बुधवारी झाला. औद्योगिक पार्क उभारण्यासाठी दोन्ही राज्ये परस्परांना सहकार्य करतील. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल उत्पादनांच्या निर्मितीला त्यामुळे चालना मिळणार आहे. त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरही देवाण-घेवाण होईल.
प्रोटोकॉल सोडून आतिथ्य
जिनपिंग यांचे विमानतळावरून हयात हॉटेलमध्ये आगमन झाले. त्या वेळी खुद्द मोदी यांनी त्यांना रिसिव्ह केले. पंतप्रधान म्हणून असलेला प्रोटोकॉल सोडून मोदींनी त्यांचे भारतीय परंपरेनुसार स्वागत केले.
रिव्हरफ्रंटच्या झोपाळ्यावर
गुजरातच्या भेटीत जिनपिंग यांना मोदींनी आपला साबरमती नदीवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प रिव्हरफ्रंट उद्यानाची सैर करून आणली. त्याचबरोबर तेथील झोपाळ्यावर बसून उभय नेत्यांनी मनमोकळा संवादही साधला. यानिमित्ताने गुजराती लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या नृत्य-संगीताचा कार्यक्रमही सादर करण्यात आला.
जॅकेट भेट, जिनपिंग यांनी चरखा चालवला
अहमदाबादमध्ये आल्यानंतर मोदींनी जिनपिंग यांना पांढऱ्या रंगाचे खादीचे जॅकेट भेट दिले. हेच जॅकेट जिनपिंग यांनी परिधान करून आश्रमाला भेट दिली. या वेळी जिनपिंग यांनी आश्रमात काही वेळ चरखा चालवून पाहिला. जिनपिंग यांनी तेथील व्हिजिटर डायरीमध्ये त्यांनी स्वाक्षरी देखील केली.
गुजराती पदार्थांचा आस्वाद
जिनपिंग यांच्यासमवेत २२ जणांचे शिष्टमंडळ आले आहे. त्यात उद्योगपती व उच्चाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासह शिष्टमंडळाच्या पाहुणचारात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून सर्व प्रकारची बडदास्त ठेवण्यात आली होती. रिव्हरफ्रंटच्या रमणीय वातावरणात पाहुण्यांनी रात्री गुजराती पदार्थांचा आस्वाद घेतला.
(छायाचित्र - साबरमती रिव्हर फ्रंट येथे झोपाळ्यावर झोके घेताना पंतप्रधान मोदी आणि चीनेच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग)