आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India China War News In Marathi, Jawaharlal Nehru, Neville Maxwell

नेहरूंच्या चुकीमुळेच झाले भारत-चीन युद्ध,ऑस्ट्रेलियन पत्रकार मॅक्सवेलचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारत व चीनदरम्यान 1962 मध्ये झालेले युद्ध जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीच्या धोरणांचा परिपाक होता. यामुळेच भारताला या युद्धात नामुष्कीचा पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियन पत्रकार नेव्हिल मॅक्सवेल यांनी हा दावा करताना भारतीय संरक्षण मंत्रालयात अत्यंत गोपनीय ठेवण्यात आलेल्या ‘हँडरसन ब्रुक्स’ अहवालाचा हवाला दिला आहे.


हँडरसन ब्रुक्स अहवाल भारतात अजूनही गोपनीय असताना त्यातील संदर्भ मॅक्सवेल यांनी दिले आहेत. चीनलगतच्या हद्दीत ज्या भूभागावर चीन दावा सांगत होता तेथे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने सुरक्षा चौक्या उभारल्या. या भागात नियमित गस्तही सुरू केला. यामुळे भडकलेल्या चीनने भारतावर हल्ला केल्याचे अहवालात नमूद आहे.


गेल्या सोमवारी मॅक्सवेल यांनी या गोपनीय अहवालातील 100 पाने आपल्या वेबसाइटवर कथितरीत्या अपलोड केली. भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल हँडरसन ब्रुक्स आणि ब्रिगेडियर पी. एस. भगत यांनी चीन युद्धाची कारणमीमांसा करताना ठोस विश्लेषणही केले होते. यात तत्कालीन राजकीय निर्णय आणि भारतीय लष्कराच्या रचनेवर ठोस भाष्य करण्यात आले होते.

वाजपेयी म्हणाले होते, अहवाल कपाटातच ठेवा..
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही हा अहवाल वाचला होता. तीन खंडांत विभागलेल्या या अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे तत्कालीन राष्ट्रीय संरक्षण सल्लागार ब्रजेश मिर्श यांनी वाजपेयींना वाचून दाखवले होते. वाजपेयी हा अहवाल चाळत असताना कक्षाबाहेर संरक्षण मंत्रालयातील एका संयुक्त सचिवांना उभे करण्यात आले होते. कोणी अचानक आत येऊ नये म्हणून हा बंदोबस्त होता. अहवालातील मुद्दे ऐकल्यानंतर वाजपेयींच्या कक्षात एकदम शांतता पसरली. थोड्या वेळानंतर वाजपेयींनी बाहेर उभ्या अधिकार्‍याला बोलावले. ‘हा अहवाल जेथून काढला तेथेच व्यवस्थित ठेवा..’, अशी सूचना त्यांनी केली होती.


रिपोर्ट 51 वर्षे कपाटबंद
मॅक्सवेलनुसार, हँडरसन ब्रुक्स अहवाल संरक्षण मंत्रालयाच्या सचिव कक्षातील कपाटात 51 वर्षांपासून बंद आहे. आजपर्यंत अनेक पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि संरक्षण सचिवांनी तो वाचला आहे. मात्र, अहवाल अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगत तो पुन्हा कपाटात ठेवला जातो.