आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जपान करणार भारताचे समर्थन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची फेररचना करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यात सहमती झाली आहे. त्याशिवाय सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाच्या दावेदारीसाठी उभय देश परस्परांचे समर्थन करणार आहेत.

२१ व्या शतकात आंतरराष्ट्रीय समुदायाच्या आकांक्षांची पूर्तता व्हावी यासाठी सुरक्षा परिषदेची फेररचना महत्वाची ठरते. त्यामुळेच भारत आणि जपानने स्थायी सदस्यत्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. ही मागणी कालसुसंगत आहे. दोन्ही पंतप्रधानांमध्ये झालेल्या चर्चेत त्यावर सहमती झाली. दहशतवादाचा सर्व पातळीवर निषेध व्हायला हवा. दहशतवादाबद्दलचे धोरण अतिशय कठोर असले पाहिजे. या मुद्द्यावर दोन्ही देशांनी परस्परांना संपूर्ण सहकार्य करण्यास सहमती दर्शवली. त्याचबरोबर दहशतवादाचा सर्व पातळ्यांवर खात्मा केला पाहिजे, असे मत उभय नेत्यांनी व्यक्त केले. दरम्यान, दोन्ही देश संयुक्त नौदल सरावही करतील. दरम्यान, मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर अनेकदा सुरक्षा परिषदेच्या विस्ताराचा मुद्दा मांडला.
कालमर्यादा नाही
उभय देशांत आण्विक ऊर्जेच्या शांततापूर्ण वापरातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी दिली. नागरी अणुऊर्जा तंत्रज्ञानाचा तपशील निश्चित करणे आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर अंतिम समझोत्यावर स्वाक्षरी होईल. परंतु अंतिम समझोत्यावरील स्वाक्षरीसाठी कोणती कालमर्यादा ठेवण्यात आली आहे, हे स्पष्ट नाही. ते नंतर कळेल.
जपानकडून ८०,४०० कोटींचे कर्ज
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपान भारताला १२ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ८०,४०० कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. तेही ५० वर्षांच्या मुदतीसाठी केवळ ०.१ टक्के व्याजाने. १५ वर्षांचे व्याज द्यावे लागणार नाही. मुंबई ते अहमदाबाद या ५०० किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्या ८ तास लागतात. बुलेट ट्रेन हे अंतर केवळ २ ते ३ तासांतच कापेल. रेल्वे मंत्रालयाने हायस्पीड रेल्वे नेटवर्कचा हीरक चतुष्कोन नावाने आराखडा तयार केला आहे. देशातील चार मेट्रो- दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकात्याला या हायस्पीड रेल्वे सेवेशी जोडले जाईल. पुणे-मुंबई, दिल्ली-आग्रा-लखनऊ,वाराणसी-पाटणा आणि हैदराबाद-चेन्नई तसेच चेन्नई-बंगळुरू-तिरुवनंतपुरम या दरम्यानही रेल्वे सुरू करण्याच्या शक्यता पाहिल्या जात आहेत. ३०० किमी प्रतितास वा त्यापेक्षा जास्त वेगाच्या गाड्यांना बुलेट ट्रेन म्हटले जाते. जपान,चीन, जर्मनीमध्येही अशा रेल्वे आहेत. जगातील पहिली गाडी जपानमध्येच १९६४ मध्ये धावली होती.
इतर करार असे
- १ मार्च २०१६ पासून जपानी नागरिकांना भारतात आल्यानंतर मिळणार व्हिसा.
संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रात संवाद वाढवला जाईल. ‘टू प्लस टू डायलॉग’ संरक्षण धोरण, संवाद, सैन्य संपर्क आणि तटरक्षक दलांतील सहकार्य तसेच संपर्कावर भर देण्यास सहमती. हवाई दलाच्या पातळीवर चर्चा होणार.

- दोन्ही देश परस्परांना संरक्षण उपकरण आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार. संयुक्त संशोधन, विकास आणि उत्पादन प्रकल्पांतही उभय देशांचा सहभाग राहणार. परस्परांच्या कायद्याच्या कक्षेत राहून गोपनीय लष्करी माहिती राखण्याचा समझोता.

- दुहेरी कर टाळण्यासाठी (डीटीएए) करार, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सामंजस्य करार, उच्च शिक्षण संस्थांमध्ये समन्वय वाढवण, केरळमध्ये लघु तथा मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार झाले.
- हिंदी महासागर क्षेत्रात भारत आणि अमेरिकेच्या नौदल सरावात जपानही सामील होईल. हा युद्धाभ्यास दरवर्षी होतो. ऑक्टोबरमध्ये बंगालच्या खाडीत झालेल्या अभ्यासात जपानी नौदल सहभागी झाले होते.