आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Links Talks With Pak To Action Over Pathankot Attack, Divya Marathi

चेंडू पाकच्या कोर्टात, कारवाई केली तरच परराष्ट्र सचिव चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पठाणकोट हवाई तळ हल्ल्याबाबत पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे भारताने दिले आहेत. पाकिस्तानने अतिरेक्यांच्या विरोधात आता ठोस आणि निर्णायक कारवाई केली तरच दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये चर्चा होऊ शकेल,असा ठाम पवित्रा भारताने गुरुवारी घेतला. त्यामुळे चेंडू आता पाकिस्तानच्या कोर्टात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांना प्रामुख्याने भारत- पाकिस्तान चर्चेच्या भवितव्याबाबतचे अनेक प्रश्न विचारण्यात आले.मात्र त्यांनी चर्चा होणार की नाही याबाबत ठामपणे काहीही सांगण्यास नकार दिला. स्वरूप म्हणाले, ‘आज जानेवारी आहे.१५ जानेवारीला अजून दिवस बाकी आहेत.’भारताने दिलेल्या पुराव्यांवर पाकिस्तान काय कारवाई करतो, हा सध्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे,असे स्पष्ट करून स्वरूप म्हणाले की, आता चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात आहे.

अंतिम मुदत दिलेली नाही
पंतप्रधानमोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. पाकिस्तानने आता ठोस कारवाई करावी, असे मोदींनी शरीफ यांना सांगितले आहे. शरीफ यांनीही निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आता तशी कारवाई अपेक्षित आहे, असे स्वरूप म्हणाले. भारताने कारवाईसाठी अंतिम मुदत दिली आहे काय, या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.

चार जणांना अटक करून भारताकडे सोपवण्याची मागणी
मौलानामसूद अझहरसह चौघांवर कुठली कारवाई करण्याची मागणी भारताने केली आहे, या प्रश्नावर सूत्रांनी सांगितले की, या चौघांनाही अटक करावी आणि त्यांना भारताच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अतिरेक्यांनी वापरलेले साहित्य पाकिस्तानी बनावटीचे होते, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही सांगितले होते.

पाकिस्तानचेपंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गुरुवारी इस्लामाबादमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. तीत भारताने दिलेल्या पुराव्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात इंटरसेप्ट केलेल्या फोन कॉल्सची माहिती आहे. हे फोन पठाणकोट हल्ला करणाऱ्या सहा अतिरेक्यांनी केले होते. पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘भारताकडून मिळालेले पुरावे पुरेसे नाहीत. त्यांच्याकडून फक्त दूरध्वनी क्रमांक मिळाले आहेत. पाकिस्तान आणखी माहिती मागवणार आहे. माहिती कमी असली तर न्यायालय संशयितांना जामीन देईल.’ या बैठकीला अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र सल्लागार सरताज अजिज, सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) नसीर खान जंजुआ, परराष्ट्र सचिव इजाज अहमद चौधरी आणि गुप्तचर संस्थेचे प्रमुख आफताब सुलतान उपस्थित होते.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी नवी दिल्लीत पठाणकोट हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मौलाना मसूद अझहरच हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार
जैश-ए-महंमदया दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रऊफ असगर, तसेच अश्फाक आणि काशीम हेच पठाणकोट हल्ल्यामागील हँडलर आहेत, असा दावा भारतीय गुप्तचर संस्थांनी केला आहे. हल्ल्याचा कट लाहोरजवळ रचण्यात आल्याचे पुरावे भारताला मिळाले आहेत,अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. त्याबाबतची माहिती योग्य चॅनलमार्फत पाकिस्तानला देण्यात आली आहे. या चौघांवर कडक कारवाई करावी, असे भारताने बजावले आहे.