आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळला अखेर शहाणपण ‘गैरसमज’ गंगेला मिळाले, नऊ करारांवर सहमती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेपाळच्या नवीन राज्यघटनेचे यश सहमती आणि संवादावर अवलंबून असल्याचे सांगून भारतासोबत आता कोणतेही ‘गैरसमज’ राहिलेले नाहीत, असे पंतप्रधान के. पी. शर्मा आेली यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यातून झाले- गेले गंगेला मिळाल्याची भावनाच दिसून आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आेली यांच्यात शनिवारी द्विपक्षीय चर्चाही झाली. त्यामध्ये नेपाळमधील राजकीय परिस्थितीवर अधिक भर देण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून मधेशी आंदोलनामुळे गैरसमज निर्माण झाला होता. परंतु आता त्याला कसलेही स्थान नाही. भारत भविष्यातही मित्र राहील, असे त्यांनी म्हटले आहे. सहमती आणि संवादातून राज्यघटनेला यश मिळू शकेल. सर्व समुदायांना सोबत घेऊन अनेक प्रश्नही मार्गी लागू शकतील असा मला विश्वास वाटतो, असे मोदी म्हणाले. उभय नेत्यांमध्ये दहशतवादाच्या विरोधातील लढाईवर कटिबद्धता व्यक्त करण्यात आली. आमच्या भूमीवरून दहशतवादी कारवायांना अजिबात स्थान नसेल.

गुन्हेगारांच्या तपासात आम्ही नेहमीच सहकार्य करू. दहशतवादी आणि गुन्हेगारांसाठी सीमा कायम बंद असेल, अशी ग्वाही मोदींनी दिली. दोन्ही देशांत नऊ सहमती करार होणार आहेत. त्या माध्यमातून विविध क्षेत्रांत सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर दिला जाणार आहे. वाहतूक, ऊर्जेसारख्या क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. मधेशी रस्त्यावर उतरल्यामुळे उभय देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला होता. मधेशी मूळचे भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे या समुदायाला भारताविषयी अधिक आस्था आहे. नवीन राज्यघटनेत या समुदायाला डावलण्यात आल्याने त्यांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन केले. त्यामुळे भारत-नेपाळ यांच्यातील व्यापार ठप्प झाला होता. दरम्यान, आेली यांचा हा सहादिवसीय भारत दौरा असून शुक्रवारी त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. आेली यांच्यासमवेत पत्नी राधिका शाक्य, उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री कमल थापा, अर्थमंत्री बिश्नू पॉड्याल, ऊर्जामंत्री बहाद्दूर रायामाजी व गृहमंत्री शक्ती बासनेत यांचे शिष्टमंडळही भारत भेटीवर दाखल झाले आहे. भारताचा दौरा करण्यापूर्वी आेली चीनला जाण्याची चर्चा होती.

नेपाळच्या स्थैर्यावर भारताची सुरक्षा अवलंबून : मोदी
नेपाळचा सर्वंकष विकास, शांततेमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. त्याचबरोबर नेपाळच्या स्थैर्यावर भारताची सुरक्षा अवलंबून आहे. भारताने नेहमीच शांततेसाठी प्रयत्न केले आहेत. दोन्ही देशांनी दहशतवादाच्या विरोधातील लढाईत सहकार्य करण्यावर सहमती दर्शवली आहे. भारताने नेपाळच्या समृद्धीसाठी सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका ठेवली आहे, असे मोदी यांनी सांगितले. नेपाळमध्ये संयुक्त जलऊर्जा प्रकल्पावर काम सुरू आहे. तेराई प्रांतात रस्ते तसेच पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे उभय देशांतील व्यापार आणि पायाभूत क्षेत्रात प्रगतीला संधी मिळेल. नेपाळ आणि भारतातील नागरिकांचे भावनिक नातेही आहे. भूकंप नेपाळमध्ये झाला होता; परंतु त्याची वेदना मात्र प्रत्येक भारतीय अनुभवत होता.