नवी दिल्ली - सीमेवर सातत्याने होणारी घुसखोरी व युद्धबंदीचे उल्लंघन रोखण्यासाठी भारत - पाकिस्तानने परस्पर चर्चा वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे. सीमा सुरक्षा दलांच्या (बीएसएफ) व पाकिस्तानी रेंजर्सनी सीमेवर शांतता कायम ठेपण्यासाठी तसेच परस्पर विश्वास निर्माण व्हावा म्हणून उपायांवर अंमलबजावणीसाठी सीमेवर संयुक्त गस्तीलाही होकार दर्शवला आहे. घुसखोरी व युद्धबंदीचे उल्लंघन टाळण्यासाठी ई-मेल, टेलिफोनवर माहिती आदान-प्रदान करण्यालाही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.
बीएसएफ व पाकिस्तान रेंजर्सच्या महासंचालकांच्या तीन दिवस चाललेल्या बैठकीचा शनिवारी समारोप झाला. त्यानंतर संस्था प्रमुखांनी संयुक्त निवदेन जारी करण्यात आले. त्यात परस्पर विश्वास वाढवण्यासाठी सुचवलेले उपाय अमलात आणणे, माहितीची खालच्या स्तरापर्यंत आदान - प्रदान करण्याचा तसेच संयुक्त गस्त घालण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. आवश्यकतेनुसार अधिकारी पातळीवर मोबाइल संपर्क व्यवस्था निर्माण करणे, खेळ व स्पर्धांच्या माध्यमातून वातावरण निर्माण करण्यावरही सहमती झाल्याचे जाहीर करण्यात आले. दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दळांत १० सप्टेंबर रोजी चर्चा सुरू झाली होती. त्याचा समारोप बीएसएफच्या वतीने महासंचालक डी. के. पाठक व पाक रेंजर्सचे प्रमुख मेजर जनरल उमर फारूक बुर्की यांच्या उपस्थितीत झाला. त्या दोघांनी करारावर संयुक्त स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी पुढील बैठक २०१६ मध्ये पाकिस्तानात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
तीन दिवस चाललेल्या या बैठकीत सीमेवर गोळीबार, अमली पदार्थांची तस्करी, घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्न तसेच सीमांची निर्मितीचा मुद्दा यावर सविस्तर चर्चा झाली. सीमावर्ती भागातील लोक चुकून सीमेपलिकडे आले गेले तर त्यांची सुरक्षित सुटका करण्यावरही भर देण्याचा निर्णय झाला. भारत -पाकिस्तान दरम्यान याआधी २०१३ मध्ये इस्लामाबादेत चर्चा झाली होती. पण त्यानंतर सुसंवाद थांबला होता.
मोदी सरकारमुळे गोळीबार वाढला : सरताज अजीज
इस्लामाबाद - भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून नियंत्रण रेषेवर तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन तसेच गोळीबाराच्या घटनांत वाढ झाली आहे, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा तसेच विदेशी सल्लागार सरताज अजीज यांनी केला आहे. कराची विद्यापीठात भाषण दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत प्रकरणांत भारताच्या हस्तक्षेपाचे पुरावे पाकिस्तान देणार आहे, असे ते म्हणाले. याआधी शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या विशेष अधिवेशनाच्या महासभेच्यावेळी भारत - पाकिस्तानदरम्यान शिखर चर्चेची कुठलीही शक्यता नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता काजी एम. खलीलुल्लाह यांनी स्पष्ट केले होते.
पाककडून युद्धबंदीचे पुन्हा उल्लंघन
जम्मू - पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर पूंछ व बालाको सेक्टरमध्ये चौक्यांवर गोळीबार केला. संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले, पाककडून कोणतेही कारण नसताना शुक्रवारी रात्री गोळीबार झाला. भारतीय जवानांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.