नवी दिल्ली - सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व पाकिस्तानी रेंजर्सच्या महासंचालक स्तरावर गुरुवारी येथे सुरू झालेल्या शांतता प्रस्थापित करण्यासंबंधीच्या चर्चेत सीमेवर होत असलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनाचा मुद्दा गाजला. या अनुषंगाने सीमा भागांत शांतता नांदावी म्हणून करावयाच्या उपाययोजनांवरही सविस्तर चर्चा झाली.
पाक रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) उमर फारुख बुर्की यांच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यांचे शिष्टमंडळ भारतात असून भारताच्या २२ सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व बीएसएफचे महासंचालक डी. के. पाठक करत आहेत. गुरुवारी चर्चेत सीमा भागात जम्मू-काश्मीर व कच्छच्या रणातून होत असलेली घुसखोरी व तस्करी तसेच नकली नोटांचा मुद्दाही गाजला.
भारताची तक्रार काय?
बीएसएफची सीमेवरील तणावाबाबत अशी तक्रार आहे की, सीमेवर गोळीबार सुरू झाल्यानंतर भारताच्या बाजूने पांढऱ्या रंगाचा झेंडा दर्शवला तरी विरुद्ध बाजूने काहीही प्रतिसाद मिळत नाही. याच मुद्यावरून ही चर्चा पुढे जाणार आहे. शनिवारपर्यंत चालणाऱ्या या चर्चेनंतर दोन्ही बाजूं जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या करतील.
पाकिस्तानची वारंवार हाराकिरी
- गेल्या १० जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची रशियातील उफामध्ये भेट झाली. त्यानंतर ९५ वेळा पाक जवानांनी युद्धबंदी मोडली आहे.
- ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरसह विविध भागांत ५५ वेळा युद्धबंदी मोडली.
- या वर्षी आतापर्यत २५० हून अधिक वेळा पाक जवानांनी असा गोळीबार केला आहे.
तिकडे सीमेवर पुन्हा गोळीबार
दिल्लीत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू असताना बुधवारी रात्री पाकिस्तानी जवानांनी सुमारे एक तास सतत गोळीबार केला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या महिन्यात पाकिस्तानी जवानांनी एकूण १० वेळा गोळीबार केला आहे. सूत्रांनुसार, बुधवारी रात्री पाकिस्तानी बाजूने प्रारंभी एक-दोन राऊंड डागण्यात आले. त्यानंतर अचानक पाक जवानांनी भारतीय चौक्यांवर हल्ला केला. याला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे एक तास दोनही बाजूंनी हा गोळीबार सुरू होता.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज...