आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Rules Out Retaliating Against Chinese Companies Over China's Masood Azhar Veto

मसूद मुद्द्यावरून भारत-चीन यांच्यात संबंध जैसे थे, एस. जयशंकर यांनी स्पष्ट केली भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जैश-ए- मोहंमदचा म्होरक्या मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीनने घेतलेल्या भूमिकेमुळे भारत-चीन संबंधावर कोणताही परिणाम होणार नाही. हा मुद्दा चीनसमोर अतिउच्च स्तरावर उपस्थित केला जाईल, अशी माहिती परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी बुधवारी दिली.

जयशंकर म्हणाले, भारत या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रात चीनला राजी करण्याचा प्रयत्न करत राहील. आपणास थोडी वाट पाहावी लागेल. मसूद अझहरवर निर्बंध लादण्याच्या भारतीय प्रस्तावावर चीनकडून दुसऱ्यांदा नकार देण्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. भारत आणि चीनच्या सीमा वादावर ते म्हणाले, दोन्ही देशांतील क्षमता एकतर्फी झाल्यास जैसे थे स्थितीवर अधिक विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जोपर्यंत क्षमता संतुलन राखले जाईल तोपर्यंत जैसे थे स्थिती ठेवली जाईल.
पर्रीकर १८ रोजी चीन दौऱ्यावर : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर १८ एप्रिल रोजी तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान दोन्ही देशांतील संरक्षण संबंध बळकट करण्यावर भर दिला जाईल. याआधी तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी २०१३ मध्ये चीन दौऱ्यावर गेले होते. पर्रीकर चीनमधील मोठ्या नेत्यांची भेट घेतील. मात्र, यादरम्यान कोणत्याही करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता नाही. गेल्यावर्षी चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनचे (सीएमसी) उपाध्यक्ष जनरल फान चांगलोंग यांनी भारताचा दौरा केला होता. सीएमसीचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आहेत.
{चिनी प्रसारमाध्यमे म्हणाली : आमच्या कंपन्यांच्या सुरक्षा तपासणीमुळे भारताला नुकसान होईल
चिनी कंपन्यांच्या सुरक्षा तपासणीवर अंकुश लावण्याच्या भारतीय प्रस्तावावर चिनी प्रसारमाध्यमांमध्ये कठोर टिप्पणी करण्यात आली आहे. याबाबत सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने गुरुवारी लिहिले की, भारत चिनी कंपन्यांवर सुरक्षात्मक तपासणी करत असेल किंवा सुरक्षा क्लियरन्स संपुष्टात आणत असेल तर भारताचेच नुकसान होईल. त्याअाधी अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात चिनी कंपन्यांना सुरक्षा क्लियरन्स देण्याचा भारत आढावा घेऊ शकतो. कारण, पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहरवरील निर्बंध लावण्यासंबंधीच्या प्रस्तावावर चीनने संयुक्त राष्ट्रात नकार दर्शवला होता.

वाद किती, म्हणाले काय?
चीन अरुणाचल प्रदेशच्या काही भागांवर आपला दावा करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा सीमावाद २,००० किमीपर्यंत मर्यादित आहे. हे क्षेत्र बहुतांश भारताच्या ईशान्य राज्यांत आहे. भारताच्या म्हणण्यानुसार, ४००० किमीपर्यंतच्या क्षेत्रावरून वाद आहे. यामध्ये लडाखचा, अक्साई चीनचाही समावेश आहे. यावर चीनने १९६२ च्या युद्धावेळी कब्जा केला होता.

चीनची गुंतवणूक मंद
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०१४ मध्ये भारत दौऱ्यादरम्यान पाच वर्षांत २० अब्ज डॉलर (सुमारे १,३३३ अब्ज रुपये) गंुतवणूक करण्याची घोषणा केली होती. मात्र, भारतीय अधिकारी आणि उद्योगपतींनुसार, सुरक्षा आणि व्हिसा नियमांतील सवलतीनंतरही चीनकडून मंद गतीने गुंतवणूक झाली.