आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्षा संपलीः आयएनएस 'विक्रमादित्‍य' अखेर भारताला मिळणार, सामर्थ्‍य वाढेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्‍बल 5 वर्षांच्‍या प्रतिक्षेनंतर भारतीय नौदलाला बलाढ्य बनविणारी आयएनएस विक्रमादित्य युद्धनौका भारताला 16 नोव्‍हेंबरला मिळणार आहे. संरक्षण मंत्री ए. के. एंटोनी त्‍यासाठी रशियाला जाणार आहेत. ही विमानवाहू युद्धनौका सेवेराद्विन्‍स्‍क बंदरावर एका समारोहात भारताच्‍या ताब्‍यात देण्‍यात येणार आहे. या समारंभात एंटोनी यांच्‍याकडून 'विक्रमादित्‍य'वर तिरंगा फडकाविण्‍यात येईल.

युद्धनौका भारतापर्यंत पोहोचविण्‍यासाठी चालकदल निवडण्‍याचे काम सुरु आहे. भारतात दाखल होण्‍याच्‍या मार्गावर 'विक्रमादित्‍य' एकूण 14 बंदरांवर थांबेल. 'सेवमाश' या कंपनीकडून युद्धनौकेची निर्मिती करण्‍यात आली आहे.

नियोजित वेळेनुसार 2008 मध्‍ये 'विक्रमादित्‍य' भारतीय नौदलात समाविष्‍ट होणार होती. परंतु, त्‍यात विलंब झाला. गेल्‍यावर्षी डिसेंबरमध्‍ये युद्धनौका भारताला सोपविण्‍याचे ठरले होते. परंतु, बॉयलर नीट काम करत नसल्‍याचे दोन महिन्‍यांच्‍या परिक्षणानंतर कळले. त्‍यामुळे पुन्‍हा विलंब झाला. भारताने 2004 मध्‍ये 5990 कोटी रुपये देऊन 'विक्रमादित्‍य' विकत घेतली होती. त्‍यानंतर ही रक्‍कम वाढवून 14, 548 कोटी रुपये करण्‍यात आली.

भारताची शक्ती वाढेल

आयएनएस 'विक्रमादित्‍य'मुळे भारताचे सामर्थ्‍य अनेक पटीने वाढेल. भारतीय नौसेनेकडे सध्‍या 'आयएनएस विराट' ही एकच विमानवाहून युद्धनौका आहे. ब्रिटनकडून विकत घेतलेली ही नौका 55 वर्षे जुनी आहे. यापेक्षा 'विक्रमादित्‍य' दुप्‍पट मोठी आहे. एकाचेळी यावर 24 मिग-29के आणि 10 हेलिकॉप्‍टर तैनात केले जाऊ शकतात. तसेच एका दिवसात 600 नॉटीकल माईल्‍स या वेगाने 'विक्रमादित्‍य' अतिशय लवकर शत्रुच्‍या तळावर पोहोचू शकते.

अशी आहे 'आयएनएस विक्रमादित्‍य'

'विक्रमादित्‍य' युद्धनौका म्‍हणजे एक तरंगते शहरच आहे. युद्धनौकेचे वजन तब्‍बल 45 हजार टन आहे. तसेच धावपट्टी 284 मीटर लांब आणि 60 मीटर रुंद आहे. म्‍हणजेच तीन फुटबॉल मैदानांएवढे. उंचीबाबत बोलायचे झाल्‍यास, 'विक्रमादित्‍य' 20 मजली इमारतीएवढी उंच आहे. त्‍यावर 22 छत असून 1608 नौसैनिक त्‍यावर राहणार आहेत. त्‍यांच्‍यासाठी 16 टन तांदुळ, 1 लाख अंडी, 20 हजार लीटर दूध आवश्‍यक असेल. 'विक्रमादित्‍य' सलग 45 दिवस समुद्रात राहू शकते.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या अजस्‍त्र युद्धनौकेची काही छायाचित्रे...