आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Told Pakistan Not To Meet Hurriyat Leaders

NSA मिटींगवर टांगती तलवार? हुर्रियत नेत्यांच्या भेटीवरून भारत-पाकमध्ये तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत-पाकिस्तानच्या NSA (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) ची रविवारी बैठक नियोजित आहे. पण हुर्रियतला भेटण्यासाठी अडून बसलेला पाकिस्तान आणि भारताने या भेटीच्या विरोधात घेतलेली भूमिका यामुळे ही बैठक रद्द होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे फुटीरतावाद्यांना भेटणे योग्य ठरणार नसल्याचे भारताने पाकला सांगितले आहे. दरम्यान, चर्चेच्या अजेंड्याबाबतही पाकिस्तानने भारताला तोंडावर पाडले आहे. भारताने 18 ऑगस्टलाच चर्चेचा अजेंडा पाठवला असल्याचे म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानने चर्चेचा अजेंडा ठरलाच नसल्याचे म्हटले आहे.

भारताने दिला सल्ला
पाकिस्तानचे NSA सरताज अजिज भारतात आल्यानंतर त्यांनी हुर्रियत नेत्यांना भेटू नये असा संदेश भारताने पाकिस्तानला पाठवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शुक्रवारी ट्विट्समध्ये याबाबत माहिती दिली. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी हुर्रियतच्या नेत्यांना 23 ऑगस्टला भेटण्याचे निमंत्रण पाठवल्याने भारत नाराज आहे. पाकने हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा केल्यास ती रशियातील उफामध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये झालेल्या कराराच्या विरोधी ठरेल असे भारताने स्पष्ट केले आहे. दोन्ही देश आपसांत चर्चा करून दहशतवाद आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील असे याठिकाणी ठरले होते.

पाक बसला अडून...
इस्लामाबादमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते काझी खलीलुल्लाह म्हणाले आहेत की, पाकिस्तान काश्मिरी लोकांबरोबर चर्चा सुरुच ठेवणार आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने नेहमीच फुटीरतावादी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे, ही परंपराच राहिली आहे, असेही पाकने म्हटले आहे. त्यांच्याशी नेहमीच सल्लामसलत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

अजेंड्याबाबतही वेगळे दावे
भारताने चर्चेच्या अजेंड्याबाबत 18 ऑगस्टलाच पाकिस्तानला माहिती पाठवली असल्याचे स्वरूप यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. पण पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मात्र कोणताही अजेंडा ठरला नसल्याचे गुरुवारी म्हटले आहे.

यापूर्वीही रद्द झाली आहे चर्चा
हुर्रियतच्या नेत्यांना भेटण्याच्या पाकिस्तानच्या हट्टामुळेच गेल्यावेळी भारत-पाकिस्तानमध्ये होणारी परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द झाली होती. दोन्ही देशांमधील चर्चेचा मुद्दा जेव्हाही समोर येतो त्यावेळी पाकिस्तान आधीच हुर्रियत नेत्यांना आमंत्रित करत असतो. हुर्रियत कॉन्फरन्स म्हणजे काही जम्मू काश्मीरच्या लोकांचे मत नसल्याचे भारताचे म्हणणे आहे. त्यामुळे पाकिस्तानला चर्चा करायची असेल तर भारत सरकारबरोबर करावी असे भारताचे म्हणणे आहे.

पाकिस्तानचा केवळ दिखावा
या मुद्यावर परराष्ट्र तज्ज्ञ जी पार्थसारथी यांनी बुधवारी सांगितले की, पाकिस्तान केवळ जगाला दाखवण्यासाठी भारताशी चर्चा करण्याचे नाटक करतो. त्यांना कोणत्याही निर्णयाची घाई नाही. उलट त्यांना चर्चा नको आहे. त्यांनी फुटीरतावादी नेत्यांना तुरुंगात डांबून चर्चा करण्याचा सल्ला दिला होता.