नवी दिल्ली - पाकिस्तानच्या दिशेने सरहद्दीवरून भारताने कधीही पहिली गोळी झाडली नाही व पहिल्यांदा झाडणार देखील नाही. खरे तर आम्हाला सर्व शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात अधिक रस आहे, अशा स्पष्ट शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तानी शिष्टमंडळासमोर देशाची भूमिका मांडली.
रेंजर्स पातळीवरील सीमावादावर चर्चा करण्यासाठी मेजर जनरल उमर फारूक बुर्की यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे शिष्टमंडळ भारत भेटीवर आहे. त्यानिमित्ताने शिष्टमंडळाने शुक्रवारी राजनाथ यांची भेट घेतली. त्या वेळी राजनाथ पुढे म्हणाले, पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवण्याची भारताची इच्छा आहे. भारत आणि पाकिस्तानला दहशतवादाची झळ पोहोचली आहे. दोन्ही देशांना दहशतवादाचा समान अनुभव आहे. त्यामुळे उभय देशांनी दहशतवादाच्या विरोधात एकत्र येऊन लढले पाहिजे. दहशतवादाबरोबरच वेगवेगळ्या पातळ्यांवर भारताला पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची इच्छा आहे. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील उफामध्ये शरीफ यांची भेट घेऊन चर्चेला सुरुवात करण्याचे आवाहन केले होते. परंतु दुर्दैवाने राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या पातळीवरील बैठक रद्द झाली. ती आैपचारिकता नव्हती. तो मनापासून केलेला प्रयत्न होता. दरम्यान, सिंह यांचा संदेश आपण पाकिस्तानच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवू, असे बुर्की यांनी म्हटले आहे.
अगोदर पडताळणी झालीच पाहिजे
सरहद्दीवर तणाव निवळण्यासाठी दोन्ही बाजूने योग्य पद्धतीने प्रयत्न व्हायला हवेत. कोणत्याही कारणाने गोळीबार झाल्यास दुसऱ्या बाजूने त्याला प्रत्युत्तर देण्याअगोदर त्याची पडताळणी झालीच पाहिजे. त्यानंतरच बॉम्बगोळे टाकण्याचा पर्याय असू शकतो. या मुद्द्यावर राजनाथ यांनी शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेत भर दिला.
..तर दक्षिण आशिया ‘शक्तिमान ’
भारत, पाकिस्तानसह दक्षिण आशियातील देशांचे सुरक्षा दल एकत्र आले तर ते ‘शक्तिमान’ बनतील. कोणत्याही परिस्थितीला हाताळण्याची क्षमता त्यांच्यात असेल, असे राजनाथ म्हणाले. म्हणूनच एकजूट गरजेची आहे.
पाकची नरमाई
तुमचा देश भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. तो महान आहे. आम्हालाही भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याची इच्छा आहे, असे पाकिस्तानी रेंजर्सचे डीजी बुर्की यांनी चर्चेदरम्यान कबूल केले.
फ्लॅग मीटिंगची प्रक्रिया
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फ्लॅग मीटिंगसाठी दोन्ही देशांच्या सुरक्षा दलाकडून झटपट प्रक्रिया राबवण्याची तयारी दाखवण्यात आल्याबद्दल गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. त्यासाठी फॅक्स, ई-मेलसारख्या आधुनिक संवाद माध्यमांचा वापर करण्यावर उभय दलांकडून सहमती व्यक्त करण्यात आली.
आज मायदेशी
दोन्ही देशांतील रेंजर्सच्या महासंचालकांतील चर्चेच्या करारावर शनिवारी स्वाक्षरी होणे अपेक्षित आहे. त्यानंतर पाकिस्तानी शिष्टमंडळ मायदेशी रवाना होईल.