कानपूर- लढाऊ विमान उडविण्यासाठी महिला नैसर्गिकरीत्या शारीरिक सक्षम नसतात, असे मत वायूदल प्रमुख अरुप राहा यांनी व्यक्त केले आहे.
एका कार्यक्रमानंतर बोलताना अरुप राहा म्हणाले, की नैसर्गिकरीत्या महिलांचे शरीर लढाऊ विमान उडविण्यासाठी सक्षम नसते. त्यामुळे उड्डाणादरम्यान त्यांना काही अवघड समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
भारतीय वायूदलात महिला वैमानिकांना लढाऊ विमाने उडविण्याची संधी का दिली जात नाही, या प्रश्नावर उत्तर देताना राहा यांनी ही माहिती दिली. पाकिस्तान आणि चीनमधील महिला वैमानिकांना मात्र लढाऊ विमाने उडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना राहा म्हणाले, की लढाऊ विमाने उडविणे एक मोठे आव्हान आहे. बऱ्याच कालावधीसाठी महिला लढाऊ विमान उडवू शकत नाहीत. त्यांचे शरीर तेवढे सक्षम नसते. गर्भवती असताना किंवा प्रकृती अस्वस्थ असताना तर ही विमाने उडविणे जवळपास अशक्य आहे. याउलट वायूदलाच्या इतर विभागांमध्ये काम करीत असलेल्या महिला अत्यंत उत्तमरीत्या त्यांचा कार्यभार पार पाडत आहेत.
लढाऊ विमानांच्या अपघातांवर बोलताना राहा म्हणाले, की गेल्या तीन-चार वर्षांमध्ये लढाऊ विमानांचे अपघात बरेच कमी झाले आहेत. अंतिम मंजुरी मिळाल्यावर तेजस या लाईट कॉम्बॅक्ट प्लेन्सचा वायूदलात समावेश केला जाईल.