नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच आलेल्या प्रलयंकारी पुराच्या काळात मदत व बचाव कार्यात नवा आदर्श घालून देणारे भारतीय हवाई दल आता आकाशात सर्वांत मोठ्या आकाराचा तिरंगा झेंडा फडकावून नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
विंग कमांडर कमलसिंह ओबेर येत्या मंगळवारी आग्राजवळ मलपुरा गावाच्या आकाशात एका मालवाहू विमानाने उड्डाण घेतील. आकाशात फे-या मारताना या विमानासोबत ४३०० फूट आकाराचा तिरंगा झेंडा फडकताना दिसेल. ओबेर सध्या तामिळनाडूत तंबाराम हवाई तळावर स्काय डायव्हिंगचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी १९९७ मध्ये ७ ऑगस्टला विंग कमांडर संजीव थाप यांनी गाझियाबादच्या आकाशात २२४६ फूट तिरंगा फडकावला होता. तो एक विक्रम होता. आता जुना विक्रम मोडून ४३०० फूट तिरंगा फडकावला जाणार आहे. यासाठी कमलसिंह यांची निवड करण्यात आली आहे. याचा सिंह यांना अभिमान आहे. हा क्षण
आपल्या जीवनातील सर्वांत आनंददायी क्षण असेल असे सिंह म्हणाले. झेंडा फडकावण्याचा विक्रम अमेरिकेतील शिकागो येथे १५ ऑगस्ट २०१२ मध्ये प्रस्थापित झाला आहे.