लेह/नवी दिल्ली - लडाख भागात चिनी सैनिकांनी मंगळवारी घुसखोरी केल्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, पेंगाँग खोऱ्यात झालेल्या या घुसखोरीनंतर भारतीय जवानांनी या चिनी सैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तुफान दगडफेक सुरू केली. यानंतर दोन्ही बाजूंनी ही दगडफेक सुरू होती. दरम्यान, मंगळवारच्या तणावानंतर भारत-चीनने फ्लॅग मीटिंग बोलावली असून या घुसखोरीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे चीनने म्हटले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हु चुनयिंग यांनी काश्मिरातील घुसखोरीबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे.
किरकोळ दुखापती : मंगळवारी चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय जवानांनी त्यांना हुसकावून लावले. मात्र, यांनतर कितीतरी वेळ चिनी सैनिक दगडफेक करत होते. यात दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापती झाल्या.
डोकलाम वादाने तणाव
सिक्कीममधील डोकलाम भागात चिनी लष्कर रस्ता बांधत असताना भारतीय लष्कराने विरोध केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांत हाणामारी झाली होती. जवळपास ५० दिवसांपासून डोकलामचा हा तणाव सुरू आहे.