नवी दिल्ली- सरंक्षण मंत्रालयाने लष्करासाठी 6 अपाचे अटॅक हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी दिली आहे. या हेलिकॉप्टर्सची निर्मिती अमेरीकेच्या बोइंग कंपनीतर्फे केली जाते. जगातील सर्वोत्कृष्ट हेलिकॅप्टर्समध्ये या हेलिकॅप्टर्सची गणना केली जाते. अपाचे हेलिकॅप्टर्सची खासियत म्हणजे अत्यंत खराब हवामान असतानाही ते लक्ष्याचा अचूक भेद करु शकतात.
4168 कोटी रुपये आहे किंमत
- गुरुवारी संरक्षण साधने खरेदी करणा-या समितीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्ली येथे पार पडली. बैठकीला अरुण जेटली यांच्यासहीत अनेक महत्त्वाच्या अधिका-यांची उपस्थिती होती.
- या बैठकीत अपाचे हेलिकॅप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या हेलिकॅप्टर्सची किंमत 4168 कोटी रुपये एवढी आहे. यासह नौदलासाठी दोन जहाजे खरेदी करण्याच्या प्रस्तावालादेखील मंजुरी देण्यात आली. यासाठी 490 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
लष्कराला का हवे आहेत हल्ला करणारे हेलिकॅप्टर्स
- मागील कित्येक वर्षांपासून लष्कराला हल्ला करणा-या हेलिकॅप्टर्सची गरज आहे. अशी मागणीही लष्कराकडून सरकारला करण्यात आली आहे.
- लष्कराचे म्हणणे आहे की, एखादे मोठे काम असेल तेव्हाच एअरफोर्सची मदत घेतली पाहिजे. त्याऐवजी आपल्या क्षेत्रावर पूर्ण ताबा ठेवण्यासाठी, आपल्या भूभागाचे संरक्षण करण्यासाठी आणि गरज पडेल तेव्हा जेथे पाहिजे तेथे लष्कराला लक्ष्य टिपता आले पाहिजे. यासाठी अशा हेलिकॅप्टर्सची आवश्यकता असल्याचे लष्कराने म्हटले आहे.
- लष्कराजवळ सध्या रशिया मेड Mi-25/35 अटॅक हेलिकॅप्टर आहे. मात्र ते खूप जुने झाले आहे.
काय आहे अपाचेचे वैशिष्टये?
- अमेरीकेच्या अडव्हॉन्स्ड अटॅक हेलिकॅप्टर प्रोग्रामअंतर्गत या हेलिकॅप्टर्सची रचना करण्यात आली होती.
- आज अमेरीकेव्यतिरिक्त हे हेलिकॅप्टर्स इस्त्राइल् आणि नेदरलँडकडे आहे.
- या हेलिकॅप्टरमध्ये दोन्ही बाजुंना 30 एमएम बंदुक लावण्यात आली आहे. यातील सेंसरद्वारे लक्ष्याचा अचूक भेद घेऊन त्याला नष्ट करता येते. यामध्ये नाईट व्हिजन यंत्रणादेखील आहे. शत्रुच्या रडारपासून वाचण्यासाठी यामध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर मिसाईल्स लावण्यात आली आहे. यामुळे रडारच्या नजरेत न येता अचुकपणे हल्ला करता येतो.