नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मिरातील (पीओके) सर्जिकल स्ट्राइक म्हणजेच लक्षित हल्ल्याच्या पुराव्यावरून वादळ उठलेले असतानाच भारतीय सैन्याने या कारवाईचा व्हिडिओ बुधवारी केंद्राला सोपवला. तो जारी करण्यास आक्षेप नसल्याचेही स्पष्ट केले. गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्हिडिओ मिळाल्याचा दुजोरा दिला आहे. मात्र सरकार पुरावे जारी न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री व भाजप नेत्यांना वक्तव्य करताना संयमाचा सल्ला दिला आहे. सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींनी मंत्री व नेत्यांना लक्षित हल्ल्याबाबत तेलमीठ लावून बोलू नका असे बजावले आहे. अधिकृत नेत्यांनीच बोलावे, अशी सूचनाही केली. बेजबाबदार विधानांची उत्तरे देण्याची काहीच गरज नाही, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल, काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यासह काहींनी लक्षित हल्ल्याचे पुरावे मागितल्याने शाब्दिक बाचाबाची सुरू झाली होती. भाजप नेते विनय कटियार, सुधांशू मित्तल, रामेश्वर शर्मा व अालोक संजर यांनी काही बेफाम वक्तव्ये केली होती. दरम्यान, अरविंद केजरीवाल, संजय निरुपम व पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध कोर्टात देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सीमेवर १०० हून अधिक अतिरेकी, घुसखोरीच्या नव्या अड्ड्यांचीही उभारणी
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर १०० हून अधिक अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत आहेत. तेथे नवे घुसखोरीचे अड्डेही तयार केले जात आहेत. सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पंतप्रधान मोदी यांना ही माहिती दिली. बैठकीत एलओसीवरील स्थितीवर विस्तृत चर्चा झाली. अतिरेकी पॅराशूट किंवा पॅराग्लायरडद्वारे आत्मघातकी हल्ले करू शकतात, असा इशारा गुप्तचरांनी दिला आहे.
गुजरातेत पाकची बोट पकडली
गुजरातमधील कच्छच्या सर क्रीक परिसरात बीएसएफने एक पाकिस्तानी बोट पकडली. त्यातील ९ मच्छीमारांना अटक केली आहे. लक्षित हल्ल्यानंतर भारतात पकडलेली ही तिसरी बोट आहे. आधी अमृतसर व गुजरात किनाऱ्यावर बोटी पकडल्या होत्या.
पुराव्यावरून आप, काँग्रेस बॅकफूटवर
लक्षित हल्ल्याचे पुरावे मागण्यावरून आप व काँग्रेस बॅकफूटवर गेले. व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही. पक्ष सरकारसोबत आहे, असे काँग्रेस नेते पी.एल. पुनिया म्हणाले. दुसरीकडे, केजरीवाल यांनी पुरावे मागितले नाहीत, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले.