आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत लष्कराच्या तुकड्यांनी पसरला होता गैरसमज, सरकार झाले होते अस्वस्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तीन आठवड्यांपू्र्वी लष्करातून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल ए. के. चौधरी यांनी मान्य केले आहे की, जानेवारी 2012 मध्ये लष्कराच्या दोन तुकड्या दिल्लीत सरावासाठी येत होत्या. यावरून गैरसमज पसरल्याने यूपीए सरकारच्या नेतृत्त्वात धडकी भरली होती.
चौधरी यांनी हे ही म्हटले आहे की, तत्कालीन संरक्षण सचिव शशिकांत शर्मा यांनी मला मध्यरात्री बोलावून घेतले होते. तसेच सत्ताधारी नेत्यांना भेटून आल्याचे सांगितले होते. लष्कराच्या तुकड्या दिल्लीकडे येत असल्याने सत्तेतील प्रमुख नेते चिंताग्रस्त झाले होते. शर्मा यांनी मला त्या दोन तुकड्या तत्काळ माघारी पाठविण्यास सांगितल्या होत्या. याबाबतच लगेच अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानंतर मी दुस-याच दिवशी सकाळी अहवाल दिला होता.
इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्स्प्रेस'ने ले. जनरल चौधरी यांच्या खुलाशाने वृत्त प्रकाशित केले आहे. याच वृत्तपत्राने 4 एप्रिल 2012 रोजी यासंबंधित वृत्त प्रकाशित केले होते. मात्र लष्करासह सरकारने याचे खंडन केले होते. मात्र, आता लष्करातील एका बड्या अधिका-यानेच याबाबत खुलासा केल्याने लष्करासह सरकार तोंडावर पडले आहे.
ले. जनरल चौधरी तीन आठवड्यांपू्र्वी बंगालच्या एरिया कमांडर पदावरून निवृत्त झाले. चौधरी यांनी म्हटले आहे की, 'दोन लोकांमध्ये' अविश्वास निर्माण झाल्याने आणि दोन्ही पक्षांनी अपरिपक्वता दाखविल्यामुळे ही भ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. जर योग्य संवाद झाला असता तर ही स्थिती निर्माण झाली नसती. ते पुढे म्हणाले, मला वाईट वाटत होते. मी प्रत्येक क्षणाक्षणाला संरक्षण मंत्रालयाच्या संपर्कात होतो. असे असतानाही मला याबाबत प्रथम माहिती दिली गेली नव्हती.
चौधरी यांनी सांगितले की, जर मला हे माहित असते की व्ही. के. सिंह जन्मतारखेवरून सरकारच्याविरोधात 16 जानेवारी 2012 ला सुप्रीम कोर्टात जाणार आहेत तर सैनिकांच्या त्या दोन तुकड्यांनी कूच केले नसते. 16 जानेवारी 2012 च्या रात्री उशिरा लष्कराची एक तुकडी हिसारकडून दिल्लीकडे तर, दुसरी पाराट्रुपर्सची तुकडी आग्राहून दिल्लीकडे कूच करण्याची घटना घडली होती. दिल्लीतील सरावात सहभागी होण्यासाठी या दोन तुकड्यांनी कुच केले होते. याबाबत सरकारला उत्तर देण्यासाठी संरक्षण सचिवांनी मला बोलावले होते.

चौधरी यांनी सांगितले की, संरक्षण सचिवांशी मुलाखत होण्याच्या एक दिवस आधी मला हिसार येथील तुकडीच्या सैनिकांनी हालचाल केल्याची माहिती मिळाली होती. मला एका अधिका-याने फोन करून याबाबत गुप्तचर संस्थांनी व्यक्त केलेल्या भीतीबाबत माहिती दिली होती. त्यांनी संरक्षण सचिवांना भेटून सांगितले होते की, सेनेचा हा नियमित सरावाचा भाग आहे. सराव झाला की दोन्ही तुकड्या माघारी फिरतील. मात्र, संरक्षण सचिवांनी मला सांगितले की, सत्तेतील नेत्यांनी मला बोलावून घेतले होते. या प्रकाराबाबत मी चिंतित आहेत. सैनिकांना दुस-या मार्गावरून जाण्याचा आदेश यापूर्वीच दिला गेला आहे. या तुकड्या सरावानंतर आपापल्या ठिकाणी पोहोचतील, असे मी संरक्षण सचिवांना माहिती दिली होती. त्यांच्या सांगण्यावरून याबाबतच मी संपूर्ण अहवाल दुस-या दिवशी मी सकाळी सचिवांना दिला होता. जो त्यांनी लगेच सरकारला दिला होता.