नवी दिल्ली - नव्या वर्षात आर्थिक सुधारणा होण्यास जगभरातील व्यावसायिकांच्या तुलनेत भारतीय व्यावसायिक जास्त आशावादी आहेत. व्यावसायिकांना सल्ला देणारी कंपनी ग्रँट थॉर्नटन यांनी केलेल्या सर्वेक्षणात देशातील ८९ टक्के व्यावसायिकांनी नवीन वर्षात देशाची अर्थव्यवस्था चांगली राहणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.
जागतिक पातळीवर विचार केल्यास ३६ टक्के व्यावसायिकांनीच आपण आशावादी असल्याचे सांगितले आहे. गेल्या तिमाहीत कंपनीच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ३६ देशांमधील २५८० उद्योजकांची मते जाणून घेण्यात आली होती. या यादीत आयर्लंडच्या ८८ टक्के व्यावसायिकांनी सकारात्मक विचार व्यक्त करून दुसरे स्थान मिळवले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर फिलिपाइन्सच्या ८४ टक्के व्यावसायिकांनी सकारात्मकता व्यक्त केली आहे. भारतातील ९२ टक्के व्यावसायिकांनी महसुलात वाढ, तर ७६ टक्के व्यावसायिकांनी नफ्यात वाढ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील ४९ टक्के व्यावसायिकांनी नवीन इमारत, ५२ टक्के तंत्रज्ञान आणि मशिनरी आणि ५१ टक्के व्यावसायिकांनी संशोधन, विकासात गुंतवणूक वाढवणार असल्याचे सांगितले. निर्यातीत वाढ होण्याची आशा २८ टक्के व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
उद्योगांसाठी मोठी संधी
अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करणारे चुकीचे असल्याचे माझे मत असल्याचे ग्रँट थॉर्नटन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सी. चांडिऑक यांनी सांगितले. उद्योगांसाठी मोठी संधी आहे. विदेशी गुंतवणुकीतील अडचणी दूर झाल्या आहेत, महत्त्वाच्या विषयातील सुधारणांवर काम सुरू आहे. हेदेखील सकारात्मक संकेत आहेत. दोन वर्षांपूर्वी याची कल्पनादेखील केली जात नव्हती.