आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Mujahideen Was Formed Before Gujrat Riots

गुजरात दंगलीच्या आधीपासून सक्रिय होती इंडियन मुजाहिदीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी गुजरातच्या दंगलीनंतर इंडियन मुजाहिदीन (आयएम)ची स्थापना झाल्याच्या वक्तव्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात आयएम ही संघटना गुजरात दंगलीच्या आधीपासूनच कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

आयएमचा संस्थापक व सर्वेसर्वा आमीर रझा खान हा जैश ए मोहंमद, हरकत उल जेहादी म्हणजेच हुजी आणि लष्कर ए तोयबा यांच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया करत होता. पाकिस्तान, दुबईतून सूत्रे हलवून तो भारतात कारवाया करायचा. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या बदनामीपासून वाचण्यासाठी आयएसआयने दहशतवादी कारवायांमध्ये भारतीयांचा वापर सुरू केला व त्यांच्या टोळीला ‘इंडियन मुजाहिदीन’ असे नाव दिले. महाबोधी मंदिर आणि हैदराबाद येथी बॉम्बस्फोटांमध्येही इंडियन मुजाहिदीनचे नाव समोर आले आहे. आता मुंबई आणि आसाम त्यांच्या निशाण्यावर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आसाममधील दंगलींचा बदला घेण्यासाठी आयएम त्या ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्याची शक्यता आहे.

आमीर रझा याने आधी रझा कमांडो फोर्स तयार केली आणि पुढे इंडियन मुजाहिदीन अस्तित्वात आली. बनारस येथील अफताब अन्सारीची आमीरचा भाऊ आसिफबरोबर तुरुंगात ओळख झाली. तो हिज्बुल मुजाहिदीनमध्ये होता. तेथेच मौलाना मसूद अझहर, उमर शेख आणि मुश्ताक अहमद झरगर यांनाही हे दोघे भेटले. अझहर आणि झरगरला सरकारने 1999 मध्ये कंदहार विमान अपहरणप्रकरणी मुक्त केले. त्यानंतर आसिफ आणि अफताबही सुटले. पुढे आमीर, आसिफ व अफताब या तिघांनी कोलकाता आणि गुजरातमध्ये अपहरण प्रकरणांमधून कोट्यवधींची कमाई केली. अफताब आणि आसिफ फेब्रुवारी 2001 मध्ये पाकिस्तानात गेले. त्या ठिकाणी ते जैश ए मोहंमदच्या मौलाना मसूद, झरगर, हुजीचा उमर शेख, लष्करच्या आझम चिमा आणि पिलखुआच्या अब्दुल करीम टुंडा यांना भेटले.

ऑक्टोबर 2001 मध्ये आसिफला दिल्ली पोलिसांचे तत्कालीन सहायक आयुक्त रविशंकर यांच्या टीमने पाकिस्तानी दहशतवाद्यांबरोबर अटक केली होती. आमीरने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांचे अपहरण आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली. अपहरण करून साखळी बस बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेल्या कामरानसह इतर दहशतवाद्यांना सोडवण्याचा त्यांचा कट होता, तर कलाम यांनी क्षेपणास्त्र आणि अणुबॉम्ब बनवला होता त्यामुळे त्यांची हत्या केली जाणार होती.


आमीर दुबईला पळाला : एकेकाळी मुंबईत राहणारा आमीर 2001 मध्ये दुबईला पळून गेला. डिसेंबर 2001 मध्ये अपहरणाच्या एका प्रकरणात पोलिस त्याचा भाऊ आसिफला गुजरातला घेऊन गेले. तेथे तथाकथित एन्काउंटरमध्ये तो मारला गेला. त्यानंतर आमीर आणि अफताबने 2002 मध्ये कोलकात्याच्या अमेरिकन सेंटरवर हल्ला केला. त्यानंतर सुरत, कोलकाता, सहारणपूर, मुजफ्फरनगर अशा विविध भागांतून एमआयचे सहा दहशतवादी पकडले गेले. त्यावरून इंडियन मुजाहिदीनचे जाळे देशभरात पसरले असल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर आयएमने 2005 मध्ये अनेक शहरांत स्फोट केले, तर 2008 मध्ये बसमध्ये साखळी स्फोट घडवून आणले.


छायाचित्रे असूनही दहशतवादी सापडेनात
ज्या दहशतवादी इंडियन मुजाहिदीन संघटनेवरून एवढा गोंधळ सुरू आहे तिच्या 31 दहशतवाद्यांपैकी एकतृतीयांश सदस्यांची छायाचित्रेही सरकारकडे नाहीत. केवळ त्यांची नावे व पत्ते आहेत. केंद्राने त्यांच्याकडे असणारी माहिती राज्यांना पाठवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुजाहिदीनचे महाराष्ट्रचे तीन आणि गुजरातचे दोन दहशतवादीही सरकारच्या मोस्ट वाँटेडच्या यादीत आहेत. या सगळ्यांची छायाचित्रे सरकारकडे आहेत. कर्नाटकच्या 10 पैकी चौघांची छायाचित्रे उपलब्ध आहेत. मुजाहिदीनचे संस्थापक असलेल्या भटकळ बंधूंची छायाचित्रेही आहेत.
.