आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

46 नर्सेस व एकूण 183 नागरिकांसह विशेष विमान मायदेशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुन्नी दहशतवाद्यांच्या कचाट्यातून सुटका झालेल्या केरळच्या 46 परिचारिकांसह एकूण 183 नागरिक इराकी एअरवेजच्या विमानाने शनिवारी दिल्लीत पोहोचले. यामध्ये महाराष्ट्रीय नागरिकांचा समावेश नव्हता. यादवी माजलेल्या इराकमध्ये सोमवारपर्यंत आणखी 600 नागरिक मायदेशी परतणार आहेत. उर्वरित 400 नागरिकांना थेट मुंबई, कोलकाता, बंगळूरू, चेन्नई, हैदराबाद येथील विमानतळावर सोमवारी आणले जाणार आहे. हे सर्व नागरिक विविध इराकी कंपन्यांमध्ये काम करीत होते. भारतात परत येण्यासाठी सर्व सोपस्कर कंपन्या पार पाडत आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

हे सर्व नागरिक परतल्यानंतर गेल्या 15 दिवसात मायदेशी येणार्‍या नागरिकांची संख्या 200 पर्यंत जाईल. माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांचे गाव तिक्रित येथे ओलीस ठेवण्यात आलेल्या केरळच्या 46 परिचारिकांना विशेष विमानाने कोची येथे पाठवण्यात आले. यापूर्वी हे विमान 137 प्रवाशांना घेऊन मुंबई येथे उतरण्यात आले. आता मोसुल येथे ओलीस ठेवलेल्या 39 भारतीयांचीही लवकरात लवकर सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

परिचारिकांचे सुटका नाट्य
46 परिचारिकांना सुन्नी दहशतवादी गुरुवारी दुपारी मोसूलच्या दिशेने अज्ञातस्थळी घेऊन गेले होते.त्यामुळे त्यांची सुटकेची आशाही संपुष्टात आली होती. अचानक भारतीयांच्या प्रयत्नांना यश येत गेले. दहशतवादी परिचारिकांना कुर्द भागाच्या सरहद्दीवर सोडण्यासाठी तयार झाले. तिथून परिचारिकांना शुक्रवारी अरबिल येथे आणले. अरबिल ही कुर्दिस्तानची राजधानी आहे. तिथे शांतता आहे. सायंकाळी एअर इंडियाचे विशेष विमान तिथे दाखल झाले व परिचारिकांचा मायदेशी प्रवास सुुरू झाला. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव एस.के.सिन्हा व केरळचे आयएएस अधिकारीही आहेत.

आणखी नागरिक स्वदेशी परतणार
इराकमध्ये सुमारे दहा हजार भारतीय आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. त्यापैकी बहुतांश नागरिक देशातील शांत, लढाई सुरू नसलेल्या भागात आहेत. त्यापैकी 2 हजार लोकांनी मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

दहशतवाद्यांचा तेल केंद्रावर कब्जा
इराक, सिरियातील कब्जा केलेल्या ठिकाणांना आयसिसने इस्लामी साम्राज्य म्हणून घोषित केले आहे. सुन्नी दहशतवाद्यांनी शुक्रवारी पूर्व सिरियातील अल तनाक तेल केंद्रावरही कब्जा केला. सिरियातील जवळपास सर्वच प्रमुख तेल व गॅस केंद्रे जिहादींच्या ताब्यात आहेत.