आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबाराच्या वर्षावाखाली शांतता चर्चा अशक्य, राष्ट्रपतींचा पाकिस्तानला टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शेजारी देशांशी वादाचे मुद्दे चर्चेद्वारे सोडवायला हवेत, पण गोळीबाराच्या वर्षावाखाली शांतता चर्चा अशक्य आहे, असा टोला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी पाकिस्तानला लगावला. दहशतवाद म्हणजे कर्करोग असून तो समूळ उखडून टाकायला हवा, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की, चांगला आणि वाईट दहशतवाद असे काहीच नसते. दहशतवाद हा दहशतवादच आहे. दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी झाले तर गोंधळाची स्थिती निर्माण होईल. दोन देशांत वाद निर्माण होतील. ज्या मुद्द्यांवर एकमत नाही त्यावर चर्चा करून तोडगा काढणे हा उपाय आहे. पण गोळ्यांच्या वर्षावाखाली कुठलीही चर्चा अशक्य असते. सरकार आणि संसद सदस्यांनी आर्थिक आणि सामाजिक सुधारणांप्रती कटिबद्ध राहावे, असे आवाहन करून राष्ट्रपती म्हणाले की, निर्णय प्रक्रियेत सर्वांना सामावून घ्यावेे, एकमत तयार करावे. सर्वांशी चर्चा करणे आवश्यक आहे. निर्णय घेण्यास त्याच्या अंमलबजावणीस उशीर झाला तर विकासाची प्रक्रिया बाधित होते.