लेह/ नवी दिल्ली - भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याची चिनी सैनिकांची खोड थांबायला तयार नाही. चिनी सैनिकांनी गेल्या महिन्यात २२ तारखेला लेह - लडाखमध्ये सीमेपासून सुमारे पाच किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली. लेहपासून १६८ किलोमीटरवर असलेल्या पेगोंग तलावात चिनी सैनिकांनी नावाही सोडल्या होत्या. अर्थात सदैव दक्ष असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी(आयटीबीपी) ही घुसखोरी हाणून पाडत कठोर पवित्रा घेऊन चिनी सैनिकांना माघारी जायला भाग पाडले. अधिकृत सूत्रांनी सांगितले, चिनी सैनिकांनी प्रथम तलावात छोट्या नावा उतरवल्या. नंतर त्याच्या पूर्व किना-यावर असलेल्या रस्त्यावरून भारतीय हद्दीत घुसखोरी केली.
गस्तीवरून वाद
पेंगोंग तलाव लेहपासून १६८ किलोमीटरवर आहे. हे क्षेत्र अतिशय उंचीवर येते. त्याचा ४५ किलोमीटरचा भाग भारतीय हद्दीत, तर सुमारे ९० किलोमीटर भाग चीनमध्ये येतो. चीनचे गस्ती पथक तलावाच्या उत्तर व दक्षिण किना-यावर नेहमीच येत -जात असते.
भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न
ज्या ठिकाणी घुसखोरी झाली ते क्षेत्र वादग्रस्त आहे. त्यावर चीन सातत्याने दावा सांगत असतो. चीनने येथून जवळच असलेल्या सिरी जप भागात रस्ताही तयार केला आहे. भारतीय जवानांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न आहे, असे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.