आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Space Become Secure, Rocket Akash Inducted In Army

भारतीय आकाश झाले सुरक्षित, क्षेपणास्त्र 'आकाश' लष्करात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: भारतीय लष्कराच्या शस्त्रागारात क्षेपणास्त्र सामील करून घेण्याच्या कार्यक्रमात ‘आकाश’चे सादरीकरण करताना लष्करी अधिकारी.
नवी दिल्ली - अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीचे आकाश हे क्षेपणास्त्र मंगळवारी भारतीय लष्करात दाखल झाले. सुमारे तीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पात संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान वापरून या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली. आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने जमिनीवरून शत्रूचे हेलिकॉप्टर्स, विमाने व मानवरहित विमाने सुमारे २५ किमी अंतरापर्यंत व २० किमी उंचीपर्यंत अचूकपणे टिपण्याची आकाश क्षेपणास्त्राची क्षमता आहे. लष्करप्रमुख दलबिरसिंग यांच्या उपस्थितीत हे क्षेपणास्त्र औपचारिकरीत्या लष्करात सामील करून घेण्यात आले.

आकाशातील सुरक्षा व्यवस्था भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. या दृष्टीने "अाकाश'च्या संकल्पनेचा जन्म झाला. मात्र, या सुरक्षेत स्वावलंबी असावे या धारणेतून आकाश क्षेपणास्त्राची निर्मिती स्वबळावर करण्याचे निश्चित झाले. ते आव्हान संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) स्वीकारले आणि पेललेही. १९८४ मध्ये डीआरडीओने सुरू केलेल्या एकीकृत क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत ज्या पाच क्षेपणास्त्रांचा अंतर्भाव करण्यात आला होता त्यातील आकाश हे एक क्षेपणास्त्र आहे. आगामी काळात या क्षेपणास्त्रांची काही राष्ट्रांना विक्री पण शक्य होणार आहे. कारण, थायलंड आणि बेलारूस यांसारख्या राष्ट्रांनी आकाश क्षेपणास्त्र खरेदीत यापूर्वीच रस दाखवला आहे.

>जमिनीवरून आकाशात अचूक मारा करण्याची क्षमता.
>९६ टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा यात वापर.
>एकाच वेळी एकपेक्षा अधिक लक्ष्य भेदण्याची क्षमता.
>पश्चिमेकडील किनारपट्टीवर तैनात केले जाणार.
१९,५०० कोटी रुपये निर्मितीवरील एकूण खर्च
२०१६ पर्यंत शेकडो क्षेपणास्त्रांचा पहिला साठा

सामर्थ्य प्रचंड वाढले
आकाशमुळे भारताचे लष्करी सामर्थ्य प्रचंड वाढले अाहे. शिवाय स्वदेशीकरणाच्या दिशेने हे पहिले यशस्वी पाऊल आहे. भारताच्या सामर्थ्यातील काही कच्चे दुवे यामुळे निश्चित दूर होतील. दलबीरसिंग, लष्करप्रमुख