आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Wall Challeng Before The Pak Terrorist, India Build Wall On Boarder

पाक दहशतवाद्यांसमोर भारतीय भिंतीचे आव्हान, भारत सीमेवर उभारणार अभेद्य भिंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी ही भारतासाठी कायमची डोकेदुखी ठरली आहे, परंतु सीमेपलीकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करणे ही आता पाकिस्तानी दहशतवाद्यांची डोकेदुखी ठरू शकते. घुसखोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आता अभेद्य भिंत उभारण्याच्या पर्यायाचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. या प्रस्तावास वेग देण्याचा निश्चय करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय भिंत उभारण्यासाठी जमीन अधिग्रहणाचे 40 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक सुभाष जोशी यांनी सांगितले की, जमीन अधिग्रहणाचे काम सध्या सुरू असले तरीही ती जमीन अद्याप सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) सोपवण्यात आलेली नाही. ती जेव्हा आमच्याकडे सोपवली जाईल, तेव्हाच प्रकल्पाशी संबंधित काही पावले उचलता येतील किंवा अधिक माहिती देता येईल. सीमेवर भिंत उभारण्याचा प्रस्ताव तसा नवा नाही. त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. कॅबिनेटनेही या प्रस्तावास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या योजनेवर सध्या काम सुरू आहे. राज्य सरकारने या अनुषंगाने आतापर्यंत 40 टक्के जमीन अधिग्रहण केले आहे. सध्या सीमेवर तारांचे कुंपण आहे. हे कुंपण पार करून घुसखोरांना सहजासहजी भारतात येता येऊ नये यासाठी अभेद्य उपाय योजन्याचे प्रयत्न केले जात आहेत.
जोशी यांनी सांगितले की, ‘कठोर उपाययोजना केल्यानंतरही त्यातून घुसखोर, दहशतवादी भारतीय हद्दीत घुसलेच तर त्यांच्यासमोर इतर अनेक आव्हाने उभी करता येतील, या दिशेने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी सीमा भागात अनेक अवरोधक, इंबेकमेंट (बांध) उभारण्यात येतील. या क्षेत्रात केवळ सुरक्षा दलांनाच सवलत असेल. यासाठी सीमेलगत 179 किलोमीटर क्षेत्रात जमिनीची निवड केली गेली आहे. त्याच बरोबर सीमेवर तारांचे कुंपण टाकण्याचे कामही जवळपास पूर्ण करण्यात आले आहे,’ असे जोशी यांनी स्पष्ट केले.
भारत-म्यानमार सीमेवरही जवान तैनात
म्यानमारसोबत भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत, परंतु दोन्ही देशांदरम्यान सध्या सीमेवर आसाम रायफल्सचे जवान तैनात आहेत. ही तुकडी लष्कराच्या आदेशानुसार काम करते. तथापि, मित्र देशांसोबत सीमेवर अशा प्रकारे जवान तैनात करण्याचा प्रघात नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या ठिकाणी आसाम रायफल्सऐवजी सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएफचे महासंचालक सुभाष जोशी यांनी सांगितले की, आम्ही या ठिकाणी बीएसएफच्या जवळपास 41 नव्या तुकड्या उभारत आहोत. त्यापैकी काही तुकड्या भारत - म्यानमार सीमेवर तैनात करणार आहोत. ही प्रक्रिया 2018 पर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.