नवी दिल्ली - स्विस बँकेत भारतीयांच्या रकमेबाबत मोठी माहिती उघड झाली आहे. एचएसबीसीच्या यादीतील भारतीयांच्या खात्यांत ४,४७९ कोटी रुपये आहेत. प्राप्तिकर विभागाने ७९ खात्यांविरुद्ध चौकशी सुरू केल्याची माहिती शुक्रवारी सरकारने दिली.
भारतातही एकूण १४,९५७.९५ कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असून प्राप्तिकर विभाग आणि ईडीसह इतर संस्था अशा प्रकरणांची चौकशी करत आहेत.
भारताला फ्रान्स सरकारकडून एचएसबीसीच्या जीनिव्हा शाखेतील खातेधारकांची माहिती मिळाली. उघड झालेली माहिती या यादीतील ६२८ भारतीयांशी संबंधित आहे. त्यापैकी २८९ खात्यांत काहीही शिल्लक आढळली नाही, अशी एसआयटीच्या अहवालात नमूद आहे. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. या ६२८ पैकी २०१
जण एकतर भारतात राहत नाहीत किंवा त्यांचा पत्ता लागत नाही. त्यामुळे ४२७ व्यक्तींच्या प्रकरणात कारवाई होऊ शकते, असे शासकीय निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकरणांतील रक्कम ४,४७९ कोटी रुपये आहे. त्यापैकी ३०० पेक्षा जास्त प्रकरणांतील ७९ कंपन्यांचे अंतिम मूल्यांकन प्राप्तिकर विभागाने केले. अशा व्यक्तींशी संबंधित खात्यांतील जाहीर न
केलेल्या शिल्लक रकमेवर २,९२६ कोटी रुपयांचा कर आकारण्यात आला आहे.