फोटो : मार्स ऑर्बिटरने पाठवलेले मंगळ ग्रहाचे पहिले छायाचित्र.
नवी दिल्ली - इस्रोने पाठवलेल्या मंगळ यानाने यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करून इतिहास रचला आहे. त्यानंतर या यानाने मंगळ ग्रहाचे पहिले छायाचित्र पाठवले आहे. यामध्ये मंगळ ग्रहचा पृष्ठभाग स्पष्टपणे दिसत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर गुरुवारी हा फोटो पोस्ट केला. इस्रोच्या एका वरिष्ट अधिका-याने सांगितले की, 'बुधवारी आम्हाला पाच फोटो मिळाले. सध्या ते सर्व प्रक्रियांमध्ये आहेत.'
त्यापूर्वी बुधवारी मंगळयान 65 कोटी किलोमीटर अंतराचा प्रवास करून मंगळ ग्रहावर पोहोचले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही मोहीम सुरू करण्यात आली होती. यान मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाल्याने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवणारा भारत पहिला देश बनला होता. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी हे यस क्रिकेटमधील भारताच्या एखाद्या मालिकाविजयापेक्षा कित्येक पटींनी मोठे असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, या मुद्यावर टीकाही झाली. पाकिस्तानचे अणु शास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान म्हणाले की, भारत कधी काळी तांत्रज्ञानाच्या बाबतीत पाकिस्तानसमोर 'बच्चा' होता, पण देशातील भ्रष्ट सरकारने देशातील वैज्ञानिकांना तुरुंगात डांबले आणि अमेरिकेच्या म्हणण्यानुसार संशोधन पूर्णपणे बंद पाडले.