आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's Supreme Court Extends Restrictions On Italian Ambassador

आमच्या न्यायव्यवस्थेला तुम्ही समजता तरी काय?- सुप्रीम कोर्टाने इटलीला फटकारले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी इटलीचे राजदूत डॅनियल मॅन्सिनी यांना आमच्या न्यायव्यवस्थेला तुम्ही समजता तरी काय, या शब्दांत फटकारले. याबरोबर न्यायालयाने इटलीच्या राजदूताला कोणतीही राजकीय सुरक्षा पुरवली जाणार नसल्याचे म्हटले आहे. दोन भारतीय मच्छीमारांचे खुनी इटालियन खलाशांना 22 मार्चपर्यंत हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी मच्छीमारांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. इटालियन राजदूत डॅनियल मॅन्सिनी यांच्या देश सोडण्याच्या बंदीची मुदत दोन एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. या दिवशी पुन्हा सुनावणी होणार आहे. इटली सरकार किंवा राजदूताने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. खलाशी व राजदूताच्या बाजूने मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी यांनी राजदूताला राजकीय सुरक्षा देण्यावर भर दिला. त्यावर न्यायालय म्हणाले की, आम्हाला काहीही ऐकायचे नाही. त्यांनी हमी घेतली होती. आम्हाला एवढे भोळे समजू नका. जो याचिकाकर्त्याच्या रूपात न्यायालयात आला, त्याला कुठली सुरक्षा असेल असे वाटत नाही. आमचा संबंध केवळ डॅनियल मॅन्सिनी यांच्याशी आहे. आपल्याला काय वाटते मिस्टर मॅन्सिनी?

तुमचा हेतू काय आहे?- जो याचिकाकर्ता म्हणून आला त्याला कोणतेही संरक्षण आहे असे आम्हाला वाटत नाही. तुम्ही आमच्या न्यायव्यवस्थेला काय समजता ? आम्हाला तुमच्या हेतूबद्दल चिंता वाटते. तुमचा हेतू तरी काय आहे मिस्टर डॅनियल मॅन्सिनी? तुम्ही या आदेशाचे पालन करणार आहात का? बाकी कशाशीच आम्हाला घेणे-देणे नाही, अशा रोखठोक शब्दांत सर्वोच्च् न्यायालयाने मॅन्सिनी यांचे कान उपटले.

अजूनही येण्याची संधी- आम्ही मॅन्सिनी यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा आदर करतो. आम्ही नौदल जवानांना चार आठवड्यांची मुदत दिली होती. ही मुदत 22 मार्चला संपत आहे. त्यांना आताही येता येईल. त्यांनी अद्याप आमच्या आदेशाचे उल्लंघन केलेले नाही. - सर्वोच्च न्यायालय

आम्ही सुप्रीम कोर्टाशी बांधील- परराष्ट्र धोरण नियंत्रित करणा-या व्हिएन्ना करारातील तरतूद व जबाबदारीची भारताला जाणीव आहे. मात्र, आम्ही सर्वोच्च् न्यायालयाच्या आदेशाशी बांधील आहेत.- सय्यद अबरुद्दीन, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय

अलर्ट कायम- सर्वोच्च् न्यायालयाने मॅन्सिनी यांना 2 एप्रिलपर्यंत भारताबाहेर जाण्यास बंदी घातल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व विमानतळांना जारी केलेला आदेश कायम आहे.

खलाशांना खटल्याला तोंड द्यावेच लागेल : चंडी
तिरुवनंतपुरम- केरळ विधानसभेत इटालियन खलाशांच्या मुद्द्यावर जोरदार गोंधळ झाला. आमदारांना शांत करत मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी खलाशांना कुठल्याही परिस्थितीत खटल्याला सामोरे जावेच लागेल, असे आश्वासन दिले. त्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधी आमदारांनी सभात्याग केला. चंडी म्हणाले, भारतीय मच्छीमारांच्या हत्येतील इटालियन आरोपींना भारतात आणण्यासाठी काहीही केले जाईल. विरोधकांनी आणलेल्या स्थगन प्रस्तावावर ते बोलत होते.